राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य समितीवर प्रा. सुषमा मांजरेकर यांची निवड

0
125

सावंतवाडी, दि.२८: नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अमलबजावणीसाठी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली असून या समितीच्या सदस्यपदी आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव ई. मू. काझी यांची सहिनिशी याबाबतचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाला आहे.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे या समितीचे अध्यक्ष, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सहअध्यक्ष तर शिक्षण आयुक्त उपाध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून राज्य प्रकल्प संचालक, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त, योजना शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिषद अध्यक्ष, मुंबई महिला विद्यापीठ माजी कुलगुरू डॉ. वसुधा कामत, डॉ. दीपक म्हैसकर, मुंबई विद्यापीठ माजी कुलगुरू सुहास पेडणेकर, पुणे ज्ञान प्रबोधिनीचे प्राचार्य मिलिंद नाईक आदी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करुन आवश्यक बडलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश, शिफारस, मार्गदर्शन तसेच ५+३+३+४ या रचनेतील शैक्षणिक कार्याचे स्नियंत्रन व सुसूत्रीकरण करण्यासाठी समिती कार्यरत राहणार आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबावणीसाठी शासनाच्या विविध संस्थांमध्ये सुयोग्य, समन्वयाने समित्या व उपसमित्या तयार करुन त्यातील सदस्यांना मार्गदर्शन व शिफारसी करण्याचे कामही ही समिती करणार आहे.
सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) या गेली २१ वर्षे आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागामध्ये त्या मराठी व हिंदी विषयाचे अध्यापन करीत आहेत. मराठी, हिंदी, अर्थशास्त्र या तीन विषयात त्यांनी एमए पदवी संपादन केली आहे. तसेच शालेय व्यवस्थापन पदवी त्यांनी संपादन केला असून एम एड पदवी चा त्यांचा अभ्यासही सुरू आहे. कोकण बोर्ड मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक, कोकण बोर्ड मॉडरेटर म्हणूनही सौ. मांजरेकर कार्यरत आहेत. प्रसिद्ध हिंदी साहित्यिक धर्मवीर भारती यांच्या अंधायुग या नाटकाचे त्यांनी मराठीत पुनर्लेखन केले असून या नाटकाचे प्रयोगही महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा, महाराष्ट्र कामगार कल्याण नाट्य स्पर्धा विक्रोळी मुंबई, व अन्य ठिकाणी प्रयोग झाले आहेत. याशिवाय शुद्ध लेखनात येणाऱ्या समस्या व उपाययोजना या विषयावर लघु प्रबंध, कोरोना कालावधीतील आँनलाईन शिक्षण व उपाययोजना या विषयावर दीर्घ निबंध लेखनही केले आहे. कोरोना काळातील आँनलाईन शाळा व शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी हे उपक्रमही सौ मांजरेकर यांनी राबविले आहेत. त्यांच्या अध्यपनचे व्हिडीओ ही यू ट्यूबवर आहेत. कोरोना महामारी काळात गोवा विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची १० १२ वी परीक्षा घेण्यातही त्यांनी सहकार्य केले होते. याशिवाय अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धांमध्ये सौ मांजरेकर यांनी पारितोषिके पटकावली आहेत. शासकीय व विविध संस्थांच्या वकृत्व व निबंध स्पर्धेत परीक्षक म्हणूनही काम केले आहे. सौ मांजरेकर यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने त्यांची राज्यस्तरीय समितीवर निवड केली आहे. या निवडीबद्दल सौ मांजरेकर यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख उपशिक्षण अधिकारी रामचन्द्र आंगणे गटशिक्षाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नीलेश परब, स्कूल कमिटी चेअरमन हेमंत कामत सचिव शांताराम गावडे, सर्व संस्था पदाधिकारी, संचालक, शिक्षक पालक संघ, मुख्याध्यापक सदाशिव धूपकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थि यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here