प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे
उरण दि.१५ : तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिरनेर गावात १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती येथील छावा प्रतिष्ठान चिरनेरच्या वतीने साजरी करण्यात आली. आरंभी छत्रपती शंभुराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल आणि भगव्या टोप्या देऊन, त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची महाआरती आणि त्यांच्या स्मृतींना ऐतिहासिक मानाचा मुजरा करून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. शिवकालीन वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणी, बच्चे कंपनी आणि महिला पुरुषांमध्ये यावेळी उत्साह संचारला होता.
छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषांनी चिरनेर गावातील वातावरण दुमदुमून गेले होते. या मिरवणुकीत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाबाई, महाराणी येसूबाई या महान स्त्री-पुरुषांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखा दिसून येत होत्या. मिरवणुकीत अश्व नृत्याचा थरारही पाहायला मिळाला. त्याचबरोबर लेझीम पथकाची प्रात्यक्षिके यावेळी पाहायला मिळाली. सोबत हरीपाठातून संतांच्या नावाचा गजर होत होता. त्यामुळे वारकरी या भक्तीत तल्लीन झालेले दिसत होते. मिरवणुकीत पुष्पवृष्टीचा वर्षाव होत होता. यात प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी देखील सहभागी झाले होती.
रात्री रसिकांच्या मनोरंजनासाठी स्टेप आर्ट्सच्या वतीने ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठानचे पदाधीकारी सचिन केणी,संतोष भोईर ,सचिन कडू,रमेश कडू,सुशिल म्हात्रे,तुषार केणी,महेश केणी,संकेत म्हात्रे,धिरज केणी,निहाल केणी,ऋषिकेश कडू,पृथ्विराज कडू,आदित्य केणी,व मित्रपरिवार तसेच हितचिंतक या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.तर श्वेता कडू,हिमानी कडू, सलोनी केणी यांनी महिला व मूलींना लेझीम साठी मार्गदर्शन केले.