सावंतवाडी,दि.०५ : येथील ओटवणे-मांडवफातरवाडी येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत गुरांच्या गोठ्यासह गवताच्या गंजी व नारळाची झाडे जळून भस्मसात झाली. यात युवा शेतकरी गणेश गावकर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र गोठ्यातील गुरे चरायला सोडल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात ग्रामस्थांना यश आले.
याबाबत माहिती अशी गावकर यांनी दुपारच्या वेळी गुरे बाहेर चरायला सोडली होती. परत गुरे घेवून आल्यावर आग लागल्याचे निदर्शनास येताच गणेश याच्या आईने गणेश याला फोन करत बोलावले. मात्र सावंतवाडी मधून येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केल्याने गवतासह नारळाची झाडे, गुरांचा गोठा सर्वच जळून खाख झाले. गोठ्या शेजारील असणाऱ्या त्यांच्या मांगरातही आग पसरत होती. मात्र प्रसंगावधानाने ती आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे.
गणेश याचा दुग्ध व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात गवताची गरज असल्याने मोठ्या प्रमाणत गवत विकत घेतले होते. जनावरांची वर्षभराची पोटगी असणारी जवळपास ३०ते ३५हजार रुपयाच्या गवताच्या कुड्याना आग लागून ती डोळ्या देखत भस्मसात झाली. स्वतः च्या शेतीतील गवत तसेच जवळपास २५हजार रुपये किमतीचे विकत घेतलेले गवत जळून खाख झाले.आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र आगीचा भडका येवढा प्रचंड होता की आग आवरणे शक्य झाले नाही. जवळपास विद्युत वाहिनी नसल्यामुळे आग नेमकी कशी लागली हेही लक्षात आले नाही.
सध्या आग लागण्याच्या प्रमाण वाढले असून यात शेतकऱ्यांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.आणि नुकसान भरपाई मिळणे कठीण मिळालीच तर तुटपुंजी. संबंधित खात्याकडून अपेक्षा एकच आहे की जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.