कार्यकर्त्यांचे सावंतवाडीत मंत्री केसरकर यांच्या घरासमोर आंदोलन
सावंतवाडी,दि.२० : सिंधुदुर्गातील डी.एड धारकांना जिल्ह्यातच नोकऱ्या द्या, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने सोमवारी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जिल्हा अंतर्गत ४५० शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्या रोखून धरणार, असा इशारा कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा समन्वयक गुणाजी गावडे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, सागर नाणोस्कर, मदन राणे, संदीप महाडेश्वर, राजू गावडे, सागर भोगटे, रुपेश खडपकर, मनीष तोटकेकर, गुरु गावकर, सागर जाधव आदींसह मोठ्या संख्येने युवा सेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
आदोलना वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यात दीपक केसरकर हाय-हाय, आता तुमचं राहील तरी काय… गद्दार है गद्दार है केसकर गद्दार है…! नोकरी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची…! अशा घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन करताना माघारी परतवले. मात्र मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आंदोलन कर्त्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू आहे.
धुरी म्हणाले, जिल्ह्यात साडेआठशे हुन अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी जिल्ह्यातील डी.एड धारकांना संधी देण्यात यावी. आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डी. एड धारक बेरोजगार आहेत. त्यांना न्याय मिळवून द्यावा. जिल्हा निवड मंडळाच्या माध्यमातून २००७ साली झालेल्या भरतीच्या धर्तीवरच पुन्हा या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवावी, अशा विविध मागण्यांकडे आंदोलनाच्या माध्यमातून केसरकरांचे लक्ष वेधण्यात आले. तर जोपर्यंत स्थानिक डी.एड धारकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणी होणाऱ्या शिक्षकांच्या ४५० जिल्हा अंतर्गत बदल्या आम्ही रोखून धरणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी उपस्थितांकडून केसरकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हातात भगवे झेंडे व निषेधाचे बॅनर घेऊन सर्व शिवसैनिक मोठ्या सख्येने रस्त्यावर उतरले होते.