बैठकीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले मार्गदर्शन..
सावंतवाडी, दि.०४ : शहरावर लादण्यात येणाऱ्या वाढीव पाणी व घरपट्टी विरोधात सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याचा निर्णय आज शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान या आंदोलनाची सुरुवात केशवसुत कट्टयावरून करण्याचे ठरवले आहे.
त्यासाठी रविवारी सायंकाळी ६ वाजता बैठक घेवून घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा की अन्य आंदोलन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरही प्रश्न न सुटल्यास मोठे जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक गुरूकल येथे पार पडली.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक वसंत केसरकर,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, देवेंद्र टेमकर,उमाकांत वारंग, सुरेश भोगटे, अफरोज राजगुरू, समीर वंजारी, अँड. राघवेंद्र नार्वेकर, चंद्रकांत कासार,शैलेश गवंडळकर, संतोष तळवणेकर,जिकर मेमन,इफ्तिकार राजगुरू, राकेश नेवगी, रवी जाधव, समिरा खलिल,नंदू मोरजकर,अभय पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर, पर्यटन तज्ञ डि.के. सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. साळगावकर म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर प्रशासक असलेल्या मुख्याधिकारी यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये पाणी पट्टी आणि घरपट्टीत वाढ केली ती वास्तववादी नाही. पाणी योजना गुरुत्वाकर्षणावर आहे. त्यामुळे ती फायद्यात आहे. मुख्याधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केली आहे.
त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करावी. सर्व पक्षीय आणि नागरीकांनी एकत्रित येवून आंदोलन केले पाहिजे. घरपट्टी २५ ते ८५ घरपट्टी होती,ती ८०० रूपये केले. या विरोधात सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे आजची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, लोकप्रतिनिधी, पक्षीय राजकारणाची भिती नोकरशाहीला राहीली नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी आपण लढा दिला पाहिजे. मुख्याधिकारी शासन परिपत्रक नाचवत आहेत. त्याचा अभ्यास करून पर्दाफाश केला पाहिजे. त्यानंतर आंदोलनाला दिशा मिळेल. सावंतवाडी कर म्हणून स्वाभिमानी वृत्तीने लढा देऊ. नगरपरिषदेवर प्रशासक असताना कर आकारणी चुकीचे आहे.
राऊळ म्हणाले, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याशी चर्चा केली असता ते परिपत्रक नाचवत आहेत. दंड बसेल म्हणून पाणी पट्टी आणि घरपट्टीत वाढ केली हे गैर आहे. कर वाढी विरोधात जनजागृती करून विरोध केला पाहिजे. आणि या विरोधात आंदोलन करण्यासाठी ठाकरे गटाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.