वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
सावंतवाडी,दि.०३ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय कडवट शिवसैनिक व सिंधुदुर्गचे माजी जिल्हाप्रमुख अनिल हरी परुळेकर ( रा. सावंतवाडी ) यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी त्याचे अल्पशा आजाराने निधन झाले असून अनेक शिवसैनिकावर शोककळा पसरली आहे.
मुंबईत शिवसेनेच्या स्थापनेपासून ते कार्यरत होते. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना रूजविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावंतवाडीत आल्यानंतर त्याच्या घरी वास्तव्यास असायचे ठाकरेंची सावंतवाडीत पहिली सभा ही त्यांनीच आयोजित केली होती.शिवसेना जिल्हाप्रमुख असतना संपूर्ण जिल्हा ते रिक्षाने पिंजून काढत असत.
राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले होते. कडवट निष्ठावंत शिवसैनिक तसेच साहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.समाजकारणाचा ध्यास घेत कडवट अन् करारी बाणा शेवटच्या श्वासापर्यंत कायम होता.तसेच सध्या सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून ही परूळेकर यांनी मोठे काम सुरू केले होते.तर काहि कामे प्रगतीपथावर असतनाच त्याचे निधन झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केले आहे.त्याच्या पश्चात मुलगी जावई असा परिवार आहे.ते माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे काका होते.