वेंगुर्ला नगरपरिषद आणि स्थानिक ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न..
वेंगुर्ले, दि.२४: येथील शिरोडा बाजारपेठ तिठा येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमध्ये पाच दुकाने जळाली आहेत. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पाण्याच्या टँकर बरोबर वेंगुर्ले नगर परिषदेचा अग्निशमन बंब दाखल झाला असून स्थानिक ग्रामस्थ आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या आगीमुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून आगीचा धूर येऊ लागल्याने आग लागल्याचे लक्षात आले. तात्काळ आजू बाजूच्या नागरिकांनी संबंधित दुकान उघडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. फार जुनी ही दुकाने असल्याने तसेच एकमेकाला लागून दुकाने असल्याने वाऱ्याच्या झोक्याने आजूबाजूला आग पसरली आणि बाजूच्या पाच दुकानांमध्ये ही आग पोहोचली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ या दुकानांमधील साहित्य बाहेर काढून नुकसानी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. वाढती आग लक्षात घेऊन वेंगुर्ले नगर परिषदेचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला असून सध्या आग विझवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.