सावंतवाडी, दि. १०: सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे सन २०२५-२६ चे वार्षिक पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि उपसंपादकांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. प्रेस क्लब भूषण पुरस्कार दैनिक कोकणसादचे सिंधुदुर्ग उपसंपादक लक्ष्मण आडाव यांना जाहीर झाला असून, पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंगचे संपादक सीताराम गावडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शैलेश मयेकर यांना ‘प्रेस क्लब डिजिटल मीडिया’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, कसाल येथील सुनील गणपत आचरेकर यांना ‘ग्रामीण पत्रकार’ पुरस्कार, तर दैनिक लोकमतचे जाहिरात प्रतिनिधी संदेश पाटील यांना ‘प्रेस क्लब कर्मचारी संघटना’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शुक्रवारी प्रेस क्लबच्या जिल्हा कार्यकारिणीतील निमंत्रित सदस्यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त झालेल्या बैठकीत या पुरस्कारांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. यामध्ये दैनिक कोकणसादचे उपसंपादक लक्ष्मण आडाव यांनी गेली अनेक वर्षे विविध वृत्तपत्रांतून केलेल्या दर्जेदार लेखनाची आणि त्यांच्या स्वतंत्र पत्रकारितेच्या शैलीची दखल घेण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच अन्यायाविरोधात आवाज उठवून सामान्यांना न्याय देण्याचे काम केले आहे, त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
डिजिटल मीडियात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे शैलेश मयेकर गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असून, स्वतःचे चॅनेल यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना डिजिटल मीडिया पुरस्कार दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रश्न मांडणारे सुनील आचरेकर आणि लोकमतमध्ये जाहिरात प्रतिनिधी म्हणून दीर्घकाळ कार्यरत असणारे संदेश पाटील यांचाही यावेळी सन्मान केला जाईल. शाल, श्रीफळ, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव व सचिव राकेश परब यांनी सर्वांचे अभिनंदन केले असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.



