सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती
सावंतवाडी, दि.०४: “सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीसाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. ही इमारत भव्य, सुसज्ज आणि अत्याधुनिक तर होईलच, पण केवळ वास्तू सुंदर असून चालणार नाही. ज्या जनतेसाठी ही इमारत बांधली जात आहे, त्यांचे प्रश्न तातडीने सुटणे अधिक महत्त्वाचे आहे. या कार्यालयातून लोकाभिमुख आणि गतिमान कारभार व्हावा,” अशा स्पष्ट सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी प्रशासनाला दिल्या.
सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी (प्रांत कार्यालय) तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या नूतन कार्यालयीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्थानिक आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ना. नितेश राणे म्हणाले की, हे कार्यालय तालुक्याचे ‘मिनी मंत्रालय’ आहे. इमारतीचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असली तरी, ते एका वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा. “आम्ही तुम्हाला सुसज्ज इमारत देतोय, पण तुम्ही जनतेची काळजी घेतली पाहिजे. अधिकारी एसीमध्ये आणि जनता बाहेर ताटकळत, असे चित्र दिसता कामा नये. प्रशासनाने ‘नाही’ हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकावा आणि नियमात बसवून लोकांची कामे त्वरित मार्गी लावावीत. आमचे काम येथे होणारच, असा विश्वास सर्वसामान्यांना वाटला पाहिजे,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
विकास आणि रोजगारावर भर
सावंतवाडी विभागाच्या जवळच असलेल्या मोपा आणि चिपी विमानतळामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रक्रियेत उपविभागीय कार्यालयाची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे सांगत पालकमंत्र्यांनी कामाच्या दर्जाबाबतही कडक सूचना दिल्या. ही इमारत किमान २५ वर्षे टिकेल अशा दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांनी देखील याप्रसंगी प्रशासनाला शुभेच्छा दिल्या. “उपविभागीय कार्यालयाची नवीन वास्तू केवळ भौतिक सुविधांपुरती मर्यादित न राहता ती लोकाभिमुख ठरेल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाची घोडदौड सुरू आहे आणि त्याला जिल्हाधिकारी व सर्व अधिकाऱ्यांची उत्तम साथ लाभत आहे,” असे केसरकर यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रांताधिकारी समीर घारे, लखमराजे भोंसले, माजी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, सचिन वालावलकर यांच्यासह महसूल व बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले, तर आभार प्रांताधिकारी समीर घारे यांनी मानले. सूत्रसंचालन सुमित दळवी यांनी केले.





