सावंतवाडी, दि. १९: सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणे ही काळाची गरज असली तरी, या प्रक्रियेत सध्या उत्कृष्ट सेवा देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे महत्त्व कमी होऊ नये यासाठी सावंतवाडीकरांनी पुढाकार घ्यावा. तसेच, रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.
सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात आयोजित महिला तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. ऐवळे पुढे म्हणाले, “सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वोत्तम रुग्णसेवा देत आहे. मात्र, मी स्वतः आणि डॉ. पांडुरंग वजराटकर लवकरच निवृत्त होत आहोत, तर दोन डॉक्टरांनी बदलीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे भविष्यात चांगल्या डॉक्टरांची येथे नितांत गरज भासणार आहे. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात कर्करोगासारख्या मोठ्या आजारांवर उपचार होतील, परंतु प्रसूती आणि इतर सामान्य आजारांसाठी उपजिल्हा रुग्णालयच आधार असणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा दर्जा टिकवणे सर्वांची जबाबदारी आहे.”
यावेळी मनीष दळवी यांनी रुग्णालयाच्या कार्याचे कौतुक केले व रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संजू परब आणि लखमराजे भोसले यांनीही रुग्णालयाच्या सकारात्मक कामाचा गौरव करत, शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले.
कार्यक्रमात रक्तदान क्षेत्रातील कार्याबद्दल देव्या सूर्याजी यांचा सत्कार करण्यात आला.




