सावंतवाडी,दि.३०: केंद्र सरकारच्या ‘पीएमश्री’ (PM Schools for Rising India) योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ‘पीएमश्री’ शाळा म्हणून बहुमान मिळवणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा क्र. १, चराठा येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. या वेळी युवा नेते संदीप गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमात चराठा येथील या शाळेचा ‘पीएमश्री’ शाळेमध्ये समावेश करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून, या यशाबद्दल जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
या वेळी बोलताना प्रभाकर सावंत म्हणाले की, “या शाळेने मिळवलेला हा बहुमान केवळ शाळेचा नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचा गौरव आहे. येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच हे यश मिळाले आहे.” या सत्कार समारंभाला बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, रेश्मा सावंत, बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ॲड. सिद्धांत भांबुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




