सावंतवाडी,दि .१५: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण, सहकार, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे विकासभाई सावंत यांचे मंगळवारी (वय ६२) दुःखद निधन झाले. माजगाव येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या निधनाने सावंतवाडीसह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विकास सावंत हे माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र होते. गेली ३६ वर्षे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सावंत यांनी राणीपार्वतीदेवी हायस्कूल, दोडामार्ग इंग्लिश स्कूल, सावंतवाडी इंग्लिश स्कूल, भाईसाहेब सावंत कॉलेज यांच्यासह अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या.
शिक्षण क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग बँकेचे संचालक म्हणून कार्यरत होते. काँग्रेस पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या विकास सावंत यांनी सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. युवा नेते विक्रांत सावंत यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.