सावंतवाडी दि.१०: गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह तैस्मै श्री गुरवे नमः आपल्या सर्वांच्या जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई- वडील आपले पहिले गुरु, त्यानंतर शिक्षक आपले गुरु असतात. त्याचप्रमाणे निसर्ग हा आपला मार्गदर्शक तथा गुरु असतो. या संकल्पनेतून यावर्षी या शाळेच्या मुलांनी निसर्ग माझा गुरु या थीमवर गुरुपौर्णिमा हा सण उत्साहात साजरा केला.
यावेळी शाळेच्या परिसरातील वृक्षांना पुष्पृष्टी करून त्यांचे पूजन करून, वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेत मुलांनी गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा केला.यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री भुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत,पालक संघाच्या श्रीमती उमा बांदेकर, तसेच अन्य पदाधिकारी,शिक्षक डी.जी.वरक, अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ, श्रीमती प्राची बिले, श्रीमती वर्षा गावकर, श्रीमती संजना आडेलकर, श्रीमती स्मिता घाडीगावकर, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापकांनी वृक्षाचे महत्त्व मुलांना पटवून दिले. वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. प्रत्येक माणूस हा परिसरातून शिकत असतो. त्या अर्थाने परिसर आपला खरा गुरु असतो. आपण परिसराला ओळखले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. परिसराची काळजी घेतली पाहिजे. वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि त्याचे संवर्धन सुद्धा केले पाहिजे. याविषयीची माहिती मुलांना दिली. मुलांनी वृक्षाप्रती प्रेम व्यक्त करताना झाडे लावू, झाडे जगवू, झाडांचे संवर्धन करू अशी प्रतिज्ञा घेतली.




