असनिये गावाचा ‘आदर्श गाव’ पुरस्काराने सन्मान”

0
20

कोकण संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कराचे झाले मुंबईत वितरण

मुंबई,दि.०१ : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरवार ३१ ऑक्टोबर रोजी “कोकण कला महोत्सव” या कार्यक्रमात असनिये गावाला “आदर्श गाव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार पद्मश्री राहीबाई पोपेरे, हिरवळ ग्रुपचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. रेणुताई दांडेकर, हास्य जत्रा फेम अभिनेते ओंकार भोजने, आवाजाचे जादूगार आणि मराठी सिनेश्रुष्टीतील दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, सिंधुदुर्ग बॅंकचे उपाध्यक्ष दिनकर तावडे, संस्थेचे ट्रस्टी योगेश भोसले आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष श्री दयानंद कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, जैवविविधतेने नटलेल्या व तब्बल ८५ हून अधिक नैसर्गिक पाण्याचे बारमाही स्रोत असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील हे असनिये गाव. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्राम पुरस्कारांसाठी नामांकन झालेल्या गावांतून असनियेने सर्व पातळींवर अव्वल क्रमांक प्राप्त केला. सरपंच व ग्रामसेवकांना रोख २५ हजार रुपये, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रामपुरस्कारासाठी संस्थेने ऑनलाईन अर्ज मागविले होते. तिन्ही जिल्ह्यांतून ५० हून अधिक ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. गावात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय लोकोपयोगी योजना, आरोग्य, शैक्षणिक उपक्रम, गावातील प्रमुख पिके, शेती व्यवसाय, महिला बचतगट व सक्षमीकरणसाठी राबविण्यात येणारे उपक्रम यावर आधारित निकष ठेवले होते. असनियेत देवराई संवर्धन, धनेश (हॉर्नबिल) पक्षाला संरक्षण तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्यास मिळतात. वन्यप्राण्यांनी येथील जंगलसंपदा समृद्ध आहे. गावात एकही विहीर नसून, या गावाला बिनविहिरीचे गाव म्हणून देखील संबोधण्यात येते. गावात मद्यपानास बंदी असून, दारुबंदी पाळणारे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच गाव आहे. या सर्व निकषांवर असनिये गावाने प्रभावी कामगिरी केल्याने आदर्श गाव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात कोकण रत्न पुरस्कार,समाज गौरव पुरस्कार, कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी ‘रील टू रियल’ पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार, ग्रामीण भागातील महिलांसाठी ‘झिरो टू हिरो’ पुरस्कार, तसेच युवा उद्योजकांसाठी ‘युथ आयकॉन’ पुरस्कार अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात युवा गायकांनी आपल्या भावगीत गायनाने मैफिल अधिक रंगतदार बनवली.

५०० + कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय ओवळे आणि संजना पाटील यांनी केले. कॉन्टेन्ट क्रिएटर गौरी पवार, अजित दळवी, सुनील करडे, गणेश नाईक, तसेच संस्थेचे व्यवस्थापक आणि संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here