दिवाळी- लक्ष्मीपूजन दिवशी विद्युत प्रवाह खंडित झाल्याने ग्रामस्थांवर अंधारात राहण्याची नामुष्की..
सावंतवाडी,दि.०१: तालुक्यात शिरशिंगे येथे गुरुवारी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसात धोंडवाडी ते परबवाडी दरम्यान असलेले पाच विजेचे खांब उन्मळून पडले आहेत.
विजेचे खांब पडल्याने विद्युत प्रवाह खंडित झाला असून परबवाडी, मळईवाडी आणि गोठवेवाडी येथील ग्रामस्थांना दिवाळीत लक्ष्मीपूजन दिवशी अंधारात राहण्याची नामुष्की ओढवली असून दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे.
दरम्यान आज सकाळीपासून वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांना घेऊन युद्ध पातळीवर काम सुरू केले असून लवकरात लवकर विद्युत प्रवाह सुरळीत केला जाईल अशा प्रकारचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
काल गुरुवारी शिरशिंगे येथे ढगांच्या गडगटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. या पावसात वीज खांबासह भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.