भालावल ग्रामपंचायतीत पार पडली ग्रामस्थ व वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची संयुक्त बैठक

0
48

सिंधुदुर्ग,दि .०५: जिल्ह्यातील वीज ग्राहकांचे अनेक प्रश्न आजमितिसही प्रलंबित असून जिल्ह्यात वीज ग्राहक संघटना स्थापन झाल्यापासून महावितरणला जाग आल्याचे चित्र समोर येत आहे. गेली अनेक वर्षे सुस्तावलेली महावितरणची व्यवस्था तात्काळ सुधारण्याची शक्यता नाही परंतु “नाक दाबल्याशिवय तोंड उघडत नाही” या म्हणीप्रमाणे जिल्हावासियांनी एकजूट दाखवून महावितरण कडून आपले हक्क भांडून घेण्यावाचून पर्याय राहिलेला नाही हे जाणताच भालावल ता. सावंतवाडी येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी गावात होणाऱ्या कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त होत महावितरण विरोधात १५ मार्च रोजी उपोषण करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी (महसूल) यांना दिले. याच अनुषंगाने भालावल ग्रामपंचायतीने वीज ग्राहक संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संधान साधून भालावल ग्रामपंचायत येथे सोमवार दिनांक ४ मार्च रोजी संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी बैठकीला सरपंच समीर परब, उपसरपंच माजी सैनिक अर्जुन परब, वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर, सदस्य कृष्णा गवस, अमित गुळेकर, रवींद्र परब, माजी सैनिक गोविंद परब, आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
भालावल येथे दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेला ६३ केव्ही ट्रान्सफॉर्मर वर्षभर व्यवस्थित चालला परंतु वर्षभरानंतर सदोष समान वापरल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होऊ लागला. गावातील ज्या दहा शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरची मागणी केली होती त्यांच्या शेतीपंपांना कमी दाबाने वीज पुरवठा सुरू राहीला परंतु परप्रांतीयांच्या केळीच्या बागांमध्ये मात्र सुरळीत वीज पुरवठा सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये गावातील स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना जागृत झाली. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून मंजूर करून आणलेला ट्रान्सफॉर्मर गावकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने नाराज झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या विरोधात दिनांक १५ मार्च २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्याकडे उपोषणास बसण्या बाबत निवेदन दिले.
गावकऱ्यांच्या निवेदनाने खडबडून जागे झालेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ६३ केवी ट्रांसफार्मर हटवून त्या ठिकाणी १०० केव्हीचा दुसरा परंतु जुना ट्रान्सफॉर्मर आणून बसविला. त्याचबरोबर कमी गेजच्या जोडणी केलेल्या तारा बदलून जास्त गेजच्या तारा बसविण्यात आल्या. परंतु गावातील फौजदारवाडी येथे असलेल्या ट्रान्सफॉर्मर मधून गावातील फौजदार वाडी, धनगर वाडी आदी वाड्यांना कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असून कमी गेजच्या तारा वापरल्याने गावकऱ्यांचे शेती पंप चालत नाहीत. याच ट्रान्सफॉर्मर मधून पुढे विलवडे गावासाठी वीज देण्याचे प्रयत्न सुरू असून ग्रामस्थांचा विलवडे गावाला वीज देण्यास विरोध नसून सदरच्या ट्रान्सफॉर्मर मधून गावातील फौजदारवाडी, धनगरवाडी आदी भागांनाच कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने त्या ट्रान्सफॉर्मर मधून विलवडे गावाला वीज पुरवठा केल्यास भालावल गावातील फौजदारवाडी व धनगरवाडी आदी वस्तींच्या विद्युत पुरवठ्याचे भवितव्य काय..? असा प्रश्न सरपंच समीर गवस यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर गावाच्या हमरस्त्यावरून गेलेल्या विद्युत तारांना (थ्री फेज) कुठेही गार्डींग नसल्याने सदरच्या तारा रस्त्यावर अथवा ज्या ज्या घरांच्या बाजूने गेल्यात त्या घरांवर पडून भविष्यात धोका उत्पन्न होऊ शकतो. इन्सुलीत जसे घर जळाले तशा घटना घडू शकतात. त्यामुळे सदरच्या थ्री फेज लाईनला गार्डिंग करणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्वांनीच बैठकीत मांडले. भालावल ग्रामपंचायतच्या समोर असलेल्या विद्युत खांबावर सहा ते सात फूट उंचीवर तीन विजेच्या फ्युज बसविण्यात आलेल्या असून सदर खांबाला स्थानिक वायरमनने बांबूची शिडी कायमस्वरूपी बांधून ठेवण्यात आलेली आहे. खांबाच्या वर उंचावर बसविण्याच्या फ्युज सात फुटावर बसवल्याने सदरच्या शिडीवर अज्ञानी मुले चढून जीवास धोका उत्पन्न होऊ शकतो. परंतु गावातील वायरमन याची दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. गावातील शाळेच्या समोरील खांबावर देखील अशाच प्रकारे सात फुटावर विद्युतभारित फ्युज बसविण्यात आल्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील गंगाराम परब यांचा विद्युत मीटर गेली दोन वर्षे होऊन अधिक काळ बंद असूनही मागणी करून देखील वीज मीटर बदलून न देता महावितरण त्यांच्याकडून सरासरी बिल वसूल करत असल्याने त्यांना नाहक भुर्दंड बसत आहे. त्याचबरोबर दशरथ परब यांचे शेतीपंपाचे बिल देखील अशाच प्रकारे सरासरी बिल देत ९००० भरणा केल्यानंतर पुन्हा १५ हजार रुपये पर्यंत रक्कम भरणा करण्यास सांगितले असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदरचे सर्व प्रश्न भालावल ग्रामस्थांनी वीज ग्राहक संघटनेसोबतच्या संयुक्त बैठकीत उपस्थित करून सर्व प्रश्न सुटेपर्यंत १५ मार्च २०२४ रोजी होणारे उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार केला आहे.
भालावल ग्रामपंचायत व ग्रामस्थांसोबतच्या संयुक्त बैठकीत वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, तालुका समन्वयक बाळासाहेब बोर्डेकर आदींनी ग्रामस्थांना वीज ग्राहकांचे हक्क या संदर्भात मार्गदर्शन केले व गावातील विद्युत पुरवठ्या बाबतच्या समस्या जाणून घेत वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड व इतर पदाधिकाऱ्यांनी भालावल ग्रामस्थांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी बैठकीला खेमा परब, गंगाराम परब, सुजय परब, विष्णू मेस्त्री, विशाल राऊळ माडखोल, लक्ष्मण परब, शांताराम परब, नितीन परब, घारू परब, बाबली परब, राजाराम गावडे, सुरेश परब, गुंडू परब, विलास परब, राजेंद्र कामत, श्रीमती रुक्मिणी परब, दशरथ परब, श्रीकृष्ण परब, संतोष परब, वसंत बाबुराव परब, वसंत महादेव परब, दत्ताराम परब, गुरुनाथ परब, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here