सावंतवाडी,दि.०५: आपल्या जीवावर उदार होऊन कोरोना काळात मृत्यू होणाऱ्या तब्बल ६० ते ७० रुग्णांसह आजपर्यंत अनेकांना सेवा देणाऱ्या
सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमीतील कर्मचारी मारुती निरवडेकर यांचा नुकताच संदीप फ्रेंड्स व शेखर सुभेदार मित्र मंडळ कडून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते त्यांचे शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
भटवाडी येथील शेखर सुभेदार मित्र मंडळ यांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या छोटीखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अनेक वर्षे श्री. निरवडेकर हे सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमीत काम करत आहेत. या काळात त्यांनी स्मशानभूमी परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबर अनेकांना सहकार्य करण्याचे काम केले आहे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या किंवा विधीसाठी येणाऱ्या अनेक लोकांना ते मार्गदर्शन करतात. अनेकांना त्यांचा फायदा होतो हे त्यांचे काम लक्षात घेऊन त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी, शेखर सुभेदार, बाळू कशाळीकर, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, अनिकेत आसोलकर, कुणाल शृंगारे, दीपक सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते.