सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ व्याख्यान

0
152

व्याख्याते शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे
सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधी

सावंतवाडी,दि.०६: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ७ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.
स्वराज्यासाठी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. या गड व किल्ल्यांच्या याच शौर्यशाली श्रृंखलेतील तामिळनाडूतील ‘जिंजी पावेतो’ वरील महाराजांचा दक्षिण दिग्वीजयाचा अजरामर पराक्रम समजून घ्यावा तितका थोडाच वाटत जातो. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत महाराजांनी १६७७-७८ च्या दरम्यान तंजावर पावेतो जिंकलेला मुलुख ही महत्त्वाची घटना होती. महाराजांचा हा दक्षिण दिग्विजय किती दूरदर्शी होता याची साक्ष छत्रपतींच्या पश्चात मराठा साम्राज्याला आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हाच जिंजी किल्ला छत्रपती राजाराम महाराजांना आश्रयाला उपयोगी पडला. त्यांनी या किल्ल्यावरून मराठ्यांची राजधानी तब्बल ८ वर्षे चालवली.
छत्रपतींचा इतिहास समजून घेताना हा दक्षिण दिग्विजय फारसा प्रकाशात आला नसल्याचे दिसते. पण हा इतिहास महाराजांच्या पराक्रमांचे रोमांचकारी पैलू सांगणारा आहे. या मोहिमेचे यथार्थ वर्णन महाराजांच्या दक्षिणेतील पराक्रमाच्या तेजस्वी पाऊलखुणा, यातील बारकाव्यासह त्यांच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ही शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. ती ऐकण्यासाठी अवघ्या रयतेने यावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे यांनी आवाहन केले आहे.

डॉ शिवरत्न शेटे हिंदवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असून महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा अभ्यासही त्यांनी केला आहे. तसेच राजे प्रत्यक्ष ज्या ज्या भागात व ज्या ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here