मतदार संघातील विविध प्रलंबित कामांविषयी वेधले खासदार विनायक राऊत यांचे लक्ष…
सिंधुदुर्ग,दि.१३: उभादांडामठ गिरपवाडी- कुर्लेवाडी भागातील मच्छिमार ग्रामस्थांची बंधाऱ्या संदर्भात अर्धवट काम पूर्ण व्हावे,दक्षिण दिशेच्या बाजूकडील समुद्र धुप प्रतिबंधक बंधारा अर्धवट स्थितित आहे. त्या कारणाने मच्छिमार ग्रामस्थांचे प्रति वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. फायबर होड्या, जाळी, घरे, झाडे व अन्न सामुग्रीचे नुकसान वेळोवेळी होत आहे. अशा विविध समस्यांबाबत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी खासदार विनायक राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या असून त्यांनी त्यांच्या स्तरावर या वर्षी सागरी धूप प्रतिबंधक बंधारा पूर्ण करून घ्यावा, ज्यामुळे येथील मच्छिमार नागरिकांचे दरवर्षी होणारे नुकसान टळेल, अशी विनंती केली आहे.
तसेच ग्रामपंचायत दांडेली, तालुका सावंतवाडी कार्यक्षेत्रामध्ये घोणसेवाडी व फणसमाडे या दोन वाड्यावर जाणारा नदीवर पूल होणे अत्यंत गरजेचे असून त्या ठिकाणी जवळ जवळ ३०० -३५० पर्यंत लोकसंख्या आहे. सदर वाडीतील लोकांना थेट गावापर्यंत ये जा करण्यासाठी सदर साकव हे एकमेव साधन आहे. सदर वाडीतील लोकवस्ती दाट असल्याने आजारी व्यक्तीना अन्य ठिकाणी नेण्यासाठी पावसाळ्यात गैरसोय होते. तसेच शाळेतील मुलांना देखील जवळजवळ २ कि.मी. वळसा घालून यावे लागते. त्यामुळे सदर ठिकाणी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. साकव वरुन चारचाकी वाहन जाणे शक्य नाही. सदर ठिकाणी ग्रामस्थांच्या मागणीनुसार पक्के पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने सौ. घारे यांनी केली. या वेळी त्यांच्या सोबत माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, दर्शना बाबर देसाई, सागर नानोस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.