सावंतवाडी, दि. ३१ : सावंतवाडीतील यशराज रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या गोवा वारखंड येथील महिलेला पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी एबी पॉझिटिव्ह पाच प्लेटलेट्ससह दोन रक्त पिशव्यांची गरज होती. एक तर ही महिला परराज्यातील त्यात एकाचवेळी पाच प्लेटलेट्ससह दोन रक्त पिशव्यांच्या गरजेमुळे या महिलेच्या नातेवाईकांसमोर आव्हानच होते. मात्र, युवा रक्तदाता संघटनेला याची माहिती मिळताच संघटनेच्या चार युवकांनी रक्तदान करीत संघटनेने या महिलेला तात्काळ पाच प्लेटलेट्ससह दोन रक्त पिशव्या उपलब्ध करून दिल्या.
सावंतवाडी येथील यशराज हॉस्पिटलमध्ये गोवा वारखंड येथील मंजिरी कांबळी ही महिला पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल आहे. त्यासाठी त्यांना एबी पॉझिटिव्ह पाच प्लेटलेट्ससह दोन रक्त पिशव्यांची गरज आहे. यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी गोवा- बांबोळी रक्तपेढीमध्ये संपर्क साधला, परंतु तेथेही रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे त्यांनी रक्त पिशव्या देण्यास टाळाटाळ केली. या महिलेच्या नातेवाईकांसमोर एबी पॉझिटिव्ह पाच प्लेटलेट्ससह दोन रक्त पिशव्यां कुठून आणायच्या हा प्रश्न समोर होता.
दरम्यान यशराज हॉस्पिटलचे डॉ. राजेश नवांगुळ यांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्याशी संपर्क साधून या महिलेसाठी मदत करण्याची विनंती करताच त्यांनी आपल्या संघटनेचे एबी पॉझिटिव्ह रक्तगटाच्या चार रक्तदात्यांशी संपर्क साधून नियोजन केले. त्यानंतर मयुरेश निब्रे, आकाश सासोलकर, शुभम गावडे, ज्ञानेश्वर पाटकर या चारही युवकांनी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले.
यावेळी चार रक्तदाते असूनही एकाचवेळी पाच प्लेटलेटस् मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे देव्या सूर्याजी यांनी तात्काळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि जिल्हा रूग्णालय रक्तपेढीचे डॉ. अमित आवळे यांच्याशी संपर्क साधत पाच प्लेटलेटस्सह दोन रक्तपिशव्या उपलब्ध झाल्या.