खैर तस्करांवर सावंतवाडी वन विभागाची कारवाई..

0
91

सावंतवाडीच्या पुष्पा गॅंगची धरपकड सुरू…..!

सावंतवाडी, दि.१९: तालुक्यातील डेगवे येथील शासकीय जंगलात खैराची तोड करून तस्करी करणाऱ्या पुष्पा गॅंग वर संयुक्तिक कारवाई करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर झटापटीत दोन आरोपी फरार झाले. अटक आरोपी महेश राम कुडव, रा.इन्सुलि (वय-१८) याला तपास अधिकारी, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी कोर्टात हजर केले. त्याला एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली. फरार आरोपी सुदीन श्रीराम अगरवडेकर, रा.तळवडे(वय-१९), मंथन आईर, रा.वाफोली(वय-१६) यांचा कसून शोध घेतला जात आहे.
याची सविस्तर हकीकत अशी की, सावंतवाडी वन विभागाच्या फिरते पथक टीमला डेगवे येथील शासकीय जंगलात काही इसमांकडून खैराची अवैधरित्या तोड करून तस्करी केली जात असलेबाबत गुप्तवार्ता हाती लागली. या पुष्पा गॅंग ला पकडण्यासाठी फिरते पथक व सावंतवाडी परीक्षेत्र कार्यालय यांनी एक मोहीम आखली. त्यानुसार दिनांक १७ मे रोजी फिरते पथकाचे वनपाल मुकुंद काशिद, वनरक्षक प्रमोद जगताप, वनरक्षक संतोष मोरे यांची टीम जंगलात दबा धरून बसली व आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. सदर आरोपींनी कटरच्या साहाय्याने खैर झाडांची तोड सुरू केली. ज्यावेळी वन विभागाच्या दबा धरून बसलेल्या टीमने आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु रात्रीच्या गर्द अंधाराचा फायदा घेत सदर आरोपी सोबत आणलेल्या वाहन व तोडीच्या हत्यारांसह फरार झाले.
त्यानंतर १८ मे रोजी तोडलेल्या खैर मालाला घेऊन जाण्यासाठी फरार आरोपी नक्की परत येतील या विश्वासाने पहाटे पासूनच फिरते पथक वनपाल मुकुंद काशिद, कॉन्स्टेबल गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, सागर भोजने, संग्राम पाटील यांची टीम जंगलात आरोपींसाठी घात लावून बसली. दुपारी सुमारे २.३० च्या दरम्यान तीन आरोपी-महेश कुडव, सुदिन आगरवडेकर व मंथन आईर हे स्कुटीवर शासकीय जंगलात तोड केलेल्या ठिकाणी तयार करून ठेवलेला खैरमाल गोळा करण्यासाठी आले असता दबा धरून बसलेल्या वन विभागाच्या टीमने आरोपींना पकडण्यासाठी झडप घातली. या झटापटीत एक आरोपी व त्यांची स्कुटी ताब्यात घेण्यात आली व दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. अटक आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सदरची कारवाई ही मा.उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली फिरते पथक वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर, वनपाल मुकुंद काशिद, कॉन्स्टेबल गौरेश राणे, वनरक्षक प्रमोद जगताप व इतर सर्व टीमने पार पाडली.
या गुन्ह्यामध्ये गुंतलेले सर्व आरोपी हे १० वी/१२ वी झालेली तरुण मुले असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे सावंतवाडी वन विभागाकडून सर्व सुजान नागरीकांना विनंतीपूर्वक आवाहन करण्यात येत आहे की आपल्या तरुण मुलांकडे जागरूकपणे लक्ष द्यावे. वाईट सांगतीला लागून ते कोणत्याही वनगुन्ह्यात गुंतणार नाहीत याविषयी आपण जागरूक रहावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here