सावंतवाडी, दि. १९: सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने आता शहरात प्रभागवार घरोघरी जाऊन जुन्या वस्तू कपडे, चप्पल, वह्या, पुस्तके आदी टिकाऊ पण टाकाऊ घरगुती वापरातील वस्तुचे रिसायकलिंग करण्याचे नियोजन केले आहे. २० मे ते ५ जून या कालावधीत सावंतवाडीकरांनी घरातील जुन्या वापरात नसलेल्या वस्तू द्याव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे. त्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचा आरोग्य विभाग सहा ठिकाणी ट्रिपल आर सेंटर सुरू करणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत पालिकेचे कर्मचारी या सेंटरवर उपस्थित राहणार आहेत.
या सेंटरमध्ये त्या-त्या प्रभागातील नागरिकांनी घरातील टाकाऊ वस्तू जमा करायच्या आहेत. ज्या व्यक्तींना गरज आहे, त्यांना त्या वापरण्यास दिल्या जाणार आहेत. यापूर्वीही तत्कालीन आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक यांनी हा उपक्रम राबविला होता. त्याला यश आले होते. त्यानंतर आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनीही असा उपक्रम राबविला. आता पालिका प्रशासन आता पुन्हा एकदा २० मेपासून १५ दिवस असा उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी नगरपालिकेसमोर व वैश्यवाडा, ज्येष्ठ नागरिक संघ, शिरोडा नाका, समाज मंदिर वाचनालयाजवळील जागा या ठिकाणी ही सेंटर्स सुरू होणार आहेत. पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, दीपक म्हापसेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.