दरवर्षीपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी करणार तैनात.. पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे.
सावंतवाडी,दि.०४ : तालुक्यातील सांगेली येथील प्रसिद्ध गिरोबा उत्सवासाठी ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी उद्या रविवार ०५ मार्च रोजी दरवर्षी पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत,अशी माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली. ते आज संध्याकाळी सांगेली देवकारवाडी येथे झालेल्या गावकऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.
यावेळी सांगेली सरपंच लवू भिंगारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीभाई राऊळ, देवस्थान कमिटीचे सचिव पंढरी राऊळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, आनंद राऊळ, आदि सांगेलीतील मानकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा ट्राफिक जाम होऊ नये यासाठी उद्या दुपारी दोन वाचल्यापासून माडखोल ते सांगेली या रस्त्यावरून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. गिरोबा उत्सवासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी धवडकी मार्गे सांगेली येथे यावे असे आवाहन ग्रामस्थांकडून आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.