सावंतवाडी, दि.२५ : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात प्रतापगडाचा रणसंग्राम या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे महाराजांच्या प्रतापगडावरील अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत.
आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वधर्म, स्वप्रजा यांच्या रक्षणार्थ पराक्रमाने ‘हिंदवी स्वराज्य’ स्थापन केले. स्वराज्यासाठी महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे व त्यांच्या तेजस्वी कामगिरीचे अनेक गड व किल्ले साक्षीदार आहेत. त्यात महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील तोरणा, राजगड, रायगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, विशाळगड, सिंधुदुर्ग यासह जिंजी पावेतो कित्येक गड व किल्ले यांचा समावेश आहे.
गड व किल्ल्यांच्या याच शौर्यशाली श्रृंखलेत प्रतापगडाचे महत्व काकणभर सरसच म्हणावे लागेल.
हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात महाराजांनी या गडावर अनेक हल्ले, संकटांचा निधड्या छातीने मुकाबला करत विजयी पताका फडकावली. लोखंडी पहारही वाकवण्याची ताकद असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजल खानाचा पराभवही महाराजांनी याच गडावर धैर्य, युक्ती व शक्तीच्या जोरावर केला.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी शिवजागराचे… रयतेचे राजे शिवराय आमुचे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, महाराजांची आग्र्याहून सुटका, नरवीर शिवा काशीद व बाजीप्रभू देशपांडे असे ५ पुष्प सादर करण्यात आले. याला आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे ६ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्याच्या सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरेल, अशी आशा आहे.