प्रभारी तहसिलदार अरूण उंडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन
सावंतवाडी,दि.१७ : केवळ चूल आणि मूल इथपर्यंत महिलांनी मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रात महिला पाहायला मिळत आहेत परंतु असे असले तरी आजही महिलांच्या बाबतीत कुठेतरी भेदभाव पाहायला मिळतो, कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अन्याय आदी विविध समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो आहे. त्यांना कायदेशीर मदत करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे असे उद्गार सावंतवाडीचे प्रभारी तहसिलदार अरुण उंडे यांनी काढले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांसाठी विधी संवाद सत्र व कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उंडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अँड. आरती पवार, महिला शहराध्यक्ष अँड. सायली दुभाषी, दर्शना बाबर-देसाई, संध्या मोरे, अँड. सिद्धी परब, सावली पाटकर, रिद्धी परब, प्रिया परब आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात २० ठिकाणी ही कार्यशाळा पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंगणवाडी सेविका या कष्टाळू व समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचतात. कोरोना महामारीत त्यांनी जीव धोक्यात घालून काम केले. गावातील प्रत्येक महिला, मुलांपर्यंत त्या पोहोचलेल्या असतात. मात्र कायद्याच्या ज्ञानाची आज खरी गरज आहे. प्रत्येक महीलापर्यत हे ज्ञान गेल पाहीजे अनेक महीला विविध समस्यांचा सामना करत आहेत मात्र त्या महिला पुढे येत नाहीत.
झालेल्या अन्यायाबद्दल बोलत नाहीत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अशा महिलांनी पुढे यावे, असे आवाहन घारे-परब यांनी केले.
मोरे म्हणाल्या,कोरोना काळासह इतरही आपत्ती काळात अंगणवाडी सेविकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. आज कायदे विषयक समुपदेशनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका विधी साक्षर होतील व याचा फायदा समाजात वावरताना होईल,घारे यांचे हे काम अतिशय चांगले अशा कामाची आज महिलांना खरोखरच गरज आहे.
यावेळी ॲड सिध्दी परब व ॲड सायली दुभाषी यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.तर अँड आरती पवार, दर्शना बाबर देसाई, मंगल कामत, संध्या मोरे आदींचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे तहसीलदार अरूण उंडे, अर्चना घारे-परब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, राकेश नेवगी, बाबल्या दुभाषी, संतोष जोईल, नवल साटेलकर, याकुब शेख, प्रा. सचिन पाटकर, रामदास गवस उपस्थित होते.