सावंतवाडी,दि.१०: तालुक्यातील शिरशिंगे येथील शेतकरी सुरेश रामा धोंड यांच्या वायंगण भातशेतीत गवा रेड्याने घुसून मोठे नुकसान केले आहे. शुक्रवारी ९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यादेखील उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शेतकरी सुरेश धोंड यांनी यंदा मोठ्या मेहनतीने वायंगण भातशेतीची लागवड केली होती. मात्र शुक्रवारी रात्री अचानक गावात गवा रेड्याचा शिरकाव झाला. या गवा रेड्याने धोंड यांच्या शेतात घुसून भात पिकाची तुडवणूक केली आणि मोठ्या प्रमाणावर पीक फस्त केले.
यामुळे सुरेश धोंड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे.
या घटनेनंतर शिरशिंगे ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वनविभागाने तात्काळ या घटनेची दखल घेऊन घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकरी सुरेश धोंड यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.




