सावंतवाडी, दि. २९ : “वस्त्रहरण” या अजरामर नाटकाचे लेखक आणि मालवणी बोलीचे खंदे पुरस्कर्ते कै. गंगाराम गवाणकर यांचे जाणे साहित्य विश्वासाठी क्लेशदायक आहे. नानांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली आणि मालवणी माणसाला आपल्या बोलीवर प्रेम करायला शिकवले. त्यांचा हा मालवणी बोलीचा वारसा कोमसापच्या माध्यमातून यापुढेही जपूया, अशा शब्दांत कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) सावंतवाडी शाखेतर्फे कै. गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोमसाप सावंतवाडी शाखेने बुधवारी सायंकाळी कै. गंगाराम गवाणकर यांच्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी कै. गवाणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी श्रद्धांजली वाहताना कोमसाप सावंतवाडी सचिव राजू तावडे म्हणाले, “मालवणीसाठीचे नानांचे योगदान विसरून चालणार नाही. कोमसाप सावंतवाडीच्या संमेलनास ते अध्यक्ष म्हणून लाभले होते हे आमचे भाग्य होय.” सदस्या मंगल नाईक जोशी यांनी, “कोमसापमुळे गंगाराम गवाणकर यांच्या सारख्या मालवणीवर प्रेम करणाऱ्या महान व्यक्तिमत्वाचा सहवास लाभला. बोलीसाठी, भाषेसाठीच त्यांचे योगदान अजरामर राहील,” अशा भावना व्यक्त केल्या.
ॲड. नकुल पार्सेकर यांनी सांगितले की, “मालवणी साहित्यात गंगाराम गवाणकर यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी लेखन केलेलं ‘वस्त्रहरण’ नाटक अजरामर झालं. मालवणी भाषा हा त्यांचा श्वास होता. मालवणी बोलीचा त्यांचा वारसा कोमसापच्या माध्यमातून यापुढेही जपूया.”
तालुकाध्यक्ष दीपक पटेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “नानांनी मालवणी भाषा सातासमुद्रापार नेली आणि मालवणी माणसाचं वेगळेपण जगाला दाखवलं. मालवणी भाषेला मानाचं स्थान मिळवून दिलं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यात मालवणी भाषा जपली, जतन केली आणि तिचा प्रचार-प्रसार केला.”
यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस आदी सदस्य उपस्थित होते.



