…’त्या’ पाच जणांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही; नातेवाईक आक्रमक, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तणाव
सावंतवाडी,दि.२९: बांदा मुस्लिमवाडी येथील फूल व्यावसायिक आफ्ताफ कमरुद्दिन शेख (३८) यांनी आज पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मात्र, आत्महत्येपूर्वी त्यांनी बनवलेल्या एका व्हिडिओमध्ये व्यवसायासाठी त्रास देणाऱ्या पाच जणांवर छळाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
या पाच जणांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत नातेवाईकांनी आणि मुस्लिम समाजाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेचा तपशील मिळालेल्या माहितीनुसार, बांदा शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आफ्ताफ शेख यांचा फुल विक्रीचा व्यवसाय होता. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेतला. बाजूच्या खोलीत असलेल्या त्यांच्या पत्नीला संशय आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले. पती आत्महत्या करत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड करत वरच्या मजल्यावर राहणारे दीर अब्दुल रझाक यांना बोलावले.


अब्दुल रझाक यांनी तातडीने दरवाजा तोडून आफ्ताफ यांना खाली उतरवले व बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गोवा-बांबोळी येथे नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले.
व्हिडिओमुळे तणाव वाढला याच दरम्यान, आफ्ताफ यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला एक व्हिडिओ नातेवाईकांच्या हाती लागला. या व्हिडिओमध्ये त्यांनी पाच जणांची नावे घेत, ते आपल्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

हा व्हिडिओ समोर येताच आफ्ताफ यांचे भाऊ अब्दुल रझाक शेख यांच्यासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत व्हिडिओत उल्लेख असलेल्या पाचही जणांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सावंतवाडी आणि बांदा येथील मुस्लिम बांधवांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली.
‘व्यवसाय बंद करण्यासाठी दिला जात होता त्रास’ आफ्ताफ यांचा भाऊ अब्दुल रझाक शेख यांनी आरोप केला की, “माझ्या भावाला एप्रिल महिन्यापासून किरकोळ गैरसमजातून फुल व्यवसाय करण्यासाठी काही जणांकडून त्रास दिला जात होता. बांद्यामध्ये आमची ही तिसरी पिढी हा व्यवसाय करत आहे. मात्र, काही जणांनी दिलेल्या त्रासामुळे भावाचा व्यवसाय बंद पडला.”
“तू दुकान सुरू केल्यास तुझ्यावर गुन्हा दाखल करू,” अशा प्रकारची धमकीही त्याला देण्यात येत होती, असे रझाक यांनी सांगितले. या संदर्भात आफ्ताफ यांनी बांदा पोलिस ठाणे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रारही केली होती, मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. व्यवसाय बंद असल्याने आफ्ताफ आर्थिक विवंचनेत होते व मानसिकरित्या खचले होते. त्या पाच जणांनी दिलेल्या त्रासातूनच त्यांनी आत्महत्या केली, असा दावा करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी कुटुंबीयांनी केली.
पोलिसांकडून मध्यस्थीचा प्रयत्न रुग्णालयात तणाव वाढत असल्याचे पाहून पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आणि उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेतले.
यावेळी ॲड. संदीप निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे महेश परुळेकर, तौकीर शेख, ॲड. शमीउल्ला ख्वाॅजा, बांदा उपसरपंच जावेद खतिब, रफिक मेमन, आसिफ शेख, मौसिम मुल्ला आदी उपस्थित होते. ॲड. निंबाळकर यांनी अल्पसंख्यांक लोकांवर अन्याय होत असल्याचा व राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करत असल्याचा आरोप केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने रुग्णालयाबाहेर तणावाचे वातावरण कायम होते.






