सावंतवाडीच्या आरोग्यसेवेला जनतेच्या पुढाकाराने नवसंजीवनी: उपजिल्हा रुग्णालयाला अखेर मिळाले फिजिशियन डॉक्टर

0
73

सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांच्या संकल्पनेला यश; भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि युवा नेते विशाल परब यांचा मोलाचा आर्थिक सहभाग

सावंतवाडी,दि.१९: येथील उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन डॉक्टर नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेता, सावंतवाडीतील जनतेने एक अभूतपूर्व आणि यशस्वी पाऊल उचलले आहे. कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता, केवळ विधायक आणि सामाजिक सहभागातून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व युवा नेते विशाल परब यांच्या भरीव आर्थिक सहकार्याने उपजिल्हा रुग्णालयाला अखेर फिजिशियन डॉक्टर मिळाले आहेत.

मागील काही काळापासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अपुऱ्या डॉक्टर संख्येमुळे चर्चेत होते. रुग्णालयातील कार्यरत डॉक्टर आणि कर्मचारी अतिरिक्त ताण सहन करत होते, तर दुसरीकडे फिजिशियन नसल्याने अनेक रुग्णांना, विशेषतः गोरगरिबांना उपचाराअभावी इतरत्र धाव घ्यावी लागत होती. रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपकरणे असूनही केवळ तज्ञ डॉक्टरअभावी त्यांचा पुरेपूर वापर होत नव्हता. शासनाकडून तात्काळ आर्थिक तरतूद शक्य नसल्याने हा प्रश्न अधिकच बिकट बनला होता.

यावर तोडगा काढण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांनी ‘जनतेच्या सहभागातून जनतेसाठी’ ही अभिनव संकल्पना मांडली. त्यांनी शहरातील दानशूर व्यक्ती आणि सामाजिक संस्थांना एकत्र येऊन डॉक्टरांच्या मानधनासाठी निधी उभारण्याचे आवाहन केले. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि युवा नेते विशाल परब यांनी तातडीने प्रतिसाद देत मोठ्या आर्थिक सहयोगाचे आश्वासन दिले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे फिजिशियन डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या मानधनाची सोय झाली.

या लोकचळवळीच्या यशानंतर, सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज डॉ. शंतनू तेंडुलकर यांची उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती झाल्याचे पत्र अधिकृतरित्या दिले. “मानधनापेक्षा सावंतवाडीतील जनतेची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे,” अशा सेवाभावी वृत्तीने डॉ. तेंडुलकर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे.

केवळ टीका-टिप्पणी किंवा विरोधाचे राजकारण न करता, समाजाच्या प्रश्नावर स्वतःहून पुढाकार घेऊन तो सोडवण्याच्या ‘सावंतवाडी पॅटर्न’चे सर्वत्र कौतुक होत आहे. ॲड. निरवडेकर, चव्हाण आणि परब यांच्या नेतृत्वात सुरू झालेली “मी सावंतवाडीकर” ही आरोग्य चळवळ भविष्यात अधिक व्यापक होऊन गोरगरीब रुग्णांसाठी एक कायमस्वरूपी आधारस्तंभ बनेल, असा विश्वास आता निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here