सावंतवाडी,दि.१८: तालुक्यातील सातार्डा येथील उत्तम स्टील कंपनी ग्रामपंचायतला अंधारात ठेऊन जमीन सपाटीकरण करत असल्याचा आरोप सरपंच श्री प्रभू यांनी केला आहे.
काम सुरु करण्यापूर्वी कंपनीने ग्रामपंचायतला पूर्व कल्पना देऊन काम सुरु करावे अशी मागणी सरपंच संदीप प्रभू यांनी केली आहे.
उत्तम स्टील कंपनीने प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे अठराशे एकर जमीन ताब्यात घेतली आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून कंपनीने प्रकल्प सुरु केला नाही. भूमिपुत्रांना रोजगार दिला नाही. काही स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी, गावाच्या स्मशानभूमीची जमीन कंपनीच्या कंपाउंड वॉलमध्ये आहे.
गेल्या पंचवीस वर्षात कंपनीने जमीन ताब्यात घेऊन कंपाउंड वॉल बांधले आहे. नियोजित सातार्डा – सातोसे – मडूरा रस्ता हस्तानतरित करून नवीन पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. कंपनीने आतापर्यंत प्रकल्प सुरु करणार असल्याच्या भुलथापा मारल्या आहेत.
प्रकल्प पाहणी करताना बँकेच्या अधिकाऱ्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गाजाबाजा करून हूल दिली आहे. प्रत्यक्षात कंपनीने प्रकल्प सुरूच केला नाही. यापुढे कंपनीने प्रकल्पाचे काम सुरु करताना ग्रामपंचायतला पूर्व माहिती द्यावी त्यानंतर काम सुरु करावे अशी मागणी सरपंच संदीप प्रभू यांनी केली आहे.