सावंतवाडी,दि.२७: मुंबई एक मायानगरी आहे हे स्वप्नाळू शहर, अनेकांच्या आकांक्षा आणि ध्येयांना आकार देणारं. पण इथे स्वप्नांसोबत संघर्षही आहे, जो प्रत्येकाला काहीतरी शिकवतो. संतोष कानसे यांनीही असंच एक मोठं स्वप्न उराशी बाळगून या शहराचा रस्ता धरला. बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण भाषेच्या अडचणी, वेगळी जीवनशैली आणि संवाद साधण्यात अडथळे हे त्यांच्या प्रवासाचे पहिलेच आव्हान होते. इंग्रजीचा ‘E’ सुद्धा न समजणारा हा तरुण, अनेकदा नोकरीच्या संधी गमावत होता. पण ते थांबले नाहीत – “माझं आयुष्य घडवायचं असेल, तर शिक्षण पूर्ण करायलाच हवं!” या दृढ निश्चयातून त्यांनी संघर्ष करत शिक्षण पूर्ण केलं, आणि आज गो सोर्स डिजीहबचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत. अशा कर्तबगार आणि ध्येयवादी युवा उद्योजक संतोष कानसे यांना कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या या वर्षीच्या युथ आयकॉन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. तसेच कला क्षेत्रातील कोकण रत्न पुरस्कार, हास्य जत्रा फेम कलाकार ओंकार भोजने यांना जाहीर झाल्याचे हि त्यांनी यावेळी सांगितले. ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित एका भव्य सोहळ्यात त्यांना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, हिरवळ ग्रुपचे अध्यक्ष किशोर धारिया, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. रेणुताई दांडेकर आणि कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
संतोष कानसे यांनी आतापर्यंत १००० तरुण युवांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या ह्या कामगिरीमुळे अनेक तरुणांना स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा मिळते. संतोष यांच्या यशाची कथा दर्शवते की, मेहनत आणि जिद्द केवळ आपल्याला यश मिळवून देत नाहीत, तर समाजाला देखील प्रगतीसाठी प्रोत्साहित करतात. ते ज्या प्रकारे इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात, त्यामुळं त्यांच्या कार्याचं महत्त्व अद्वितीय आहे. संतोष यांचं प्रेरणादायी कार्य तरुणांना त्यांच्या ध्येयांचा पाठलाग करण्यास आणि स्वतःला सिद्ध करण्यास प्रोत्साहित करत आहे.
३१ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात कन्टेन्ट क्रिएटरसाठी ‘रील टू रियल पुरस्कार’, आदर्श गाव पुरस्कार, ग्रामीण भागातील महिलांसाठी झिरो टू हिरो पुरस्कर, युवा उद्योजकांसाठी युथ इन्स्पायर पुरस्कार अशा विविध पुरस्काराचे वितरण होणार असून हा कार्यक्रम रंगतदार होण्यासाठी युवा गायक आपल्या भावगीत गायनाने हि मैफिल सजवणार आहेत.