सावंतवाडी,दि.२४: मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ आणि सावंतवाडी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागासाठी सुरू करण्यात येत असलेल्या “ग्रैंड मास्टर चोआ कॉक् सुई फिरते वैद्यकीय पथक” याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. सावंतवाडीत राजवाडा येथील बँक्वेट सभागृहात होणार आहे. या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहूणे सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोसले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्वर राहणार आहेत.
या फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत दाणोली पंचक्रोशीतील फणसवडे, केसरी, दाणोली गावठण, पारपोली, देवसू, ओवळीये या गावांसह आंबेगाव, कुणकेरी या दुर्गम भागात डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी करुन औषधे देण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा फिरता दवाखाना या गावात जाणार आहे. या फिरत्या वैद्यकीय दवाखान्याच्या गाडीतच रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तशी या गाडीत हात धुण्यासाठी बेसिन, रुग्ण तपासणी साठी बेड, रुग्ण बसण्यासाठी बेंच, औषध विभाग, डॉक्टर व नर्स यांच्यासाठी आसन अशी व्यवस्था आहे.
या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथचे विश्वस्त सीए विवेक दोषी आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी केले आहे.