सावंतवाडी,दि.२३: महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर, प्रदेश अध्यक्ष किरण बागुल यांच्या सूचनेनुसार तसेच कोकण विभाग अध्यक्ष प्रा. रुपेश पाटील व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले यांच्या शिफारशीनुसार निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली आहेत.
अनेक ज्वलंत विषयांवर सातत्याने आवाज उठवणारे युवा पत्रकार विनायक गांवस व सुमित दळवी यांना पत्रकार क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार, तर कोकणातील पहिले आयआयटी मधून पदवी प्राप्त करणारे, अनेक विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षांच्या तयारीसाठी परफेक्ट अकॅडेमीच्या माध्यमातून तयारी करून घेणारे, प्रा. राजाराम महादेव परब यांची ‘ एज्युकेशनल आयडॉल’ आणि मल्लसम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय कबड्डीपटू जावेद शेख यांची ‘आदर्श क्रीडा संघटक’ या पुरस्कारासाठी निवड जाहीर करण्यात आली आहे.
६ ऑक्टोबर रोजी धुळे येथील दाते रिजेन्सी हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार गोवाल पाडवी, आ. कुणाल पाटील, आ. अमरीश पटेल, आ. डॉ. फारुक शाह, आ. शिरीष नाईक, आ. सत्यजित तांबे, आ. मंजुळा गावित, आ. किशोर दराडे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, युवा नेते राम भदाणे आदी मान्यवर महोदयांच्या हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
पुरस्कार विजेत्यांच्या यांच्या एकूण कार्याच्या अवलोकनानुसार त्यांची सदर पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असल्याचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर, प्रदेशाध्यक्ष किरण बागुल, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी कळविले आहे.
पुरस्कार विजेत्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.