२९ जुलै रोजी अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनी च्या कार्यालयाला देणार धडक..
सिंधुदुर्ग,दि.२६: जिल्ह्यातील सावंतवाडी वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यांमध्ये शहर – ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत नसल्याने येथील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
या कारणास्तव येत्या २९ जुलै रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने कुडाळ येथे सकाळी ११.३० वा अधीक्षक अभियंता वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाप्रमुख शबाबुराव धुरी,जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार व प्रकाश गडेकर, महिला संघटिका सौ. सुकन्या नरसुले व सर्व तालुका प्रमुखांच्या नेतृत्वाखाली जाब विचारण्यात येणार आहे, तरी सावंतवाडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
दरम्यान शहर – ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील अडीच वर्षांपूर्वी वीज वितरण कंपनीची यंत्रणा कोलमडली नव्हती, त्याहीपेक्षा जास्त यंत्रणा सद्यस्थितीत कोलमडली आहे. वीज वितरण कंपनीने जुनाट यंत्रसामुग्री बदलली नाही. तसेच गरज असलेले मनुष्यबळ ही नाही अशी परिस्थिती झाल्यामुळे पाच पाच मिनिटांत लाईट सुरू बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. सिंधुदुर्गनगरी मधील जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी देखील वीज वितरण कंपनीच्या कामकाजाचा अनुभव घेतला आहे.
वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेती बागायती चे काम सोडून जाब विचारण्यासाठी नागरिक कार्यालयाला धडक देऊन जाब विचारत आहेत. जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने ज्यांच्याकडे आहेत आहेत त्या लोकप्रतिनिधीनी वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडले आहे. महाराष्ट्र राज्य सरकार मध्ये दोन कॅबिनेट मंत्री आहेत. एकाकडे पालकमंत्री, सार्वजनिक मंत्रालय तर दुसऱ्याकडे शिक्षण व मराठी भाषा मंत्रालय आहे. तर तिसरे माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार आहेत. जनतेच्या प्रश्नावर आंदोलन संघर्ष करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी ते कुचकामी ठरले आहेत.
वीज वितरण कंपनीने कामकाजात सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत. लोकांना सुरक्षित व सुरळीत वीजपुरवठा झाला पाहिजे. जुनाट यंत्रसामुग्री बदलली पाहिजे म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने सोमवारी कुडाळ येथे जाऊन जाब विचारला जाणार आहे. त्यावेळी वीज ग्राहक, ठाकरे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन विधानसभाप्रमुख,सावंतवाडी मतदारसंघ रुपेश राऊळ यांनी केले आहे.