गेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात उद्या संदीप गावडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण..

0
36

सावंतवाडी,दि.२५ : तालुक्यातील गेळे गावच्या कबुलायतदार गांवकर प्रश्ना संदर्भात मागीलवर्षी २६ जुलै रोजी शासन निर्णय होऊन देखील तसेच त्या संदर्भात गेळे ग्रामस्थांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव व वाटप केलेले नकाशे प्रशासनाला देऊन देखील जमीन वाटपा संदर्भात जिल्हा प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी देखील या संदर्भात निर्देश दिलेले असताना जिल्हा प्रशासनाची याबाबतची भुमिका संशयास्पद आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी उद्या २५ जुलै रोजी दु.११.३० पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडणार असल्याची माहिती गेळे ग्रामस्थांच्यावतीने आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदत घेत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला.

गेळे गावातील कबुलायतदार गांवकर जमीनी वाटपा संदर्भात २६ जुलै २०२३ रोजी शासन निर्णय झाला होता. मात्र, त्यात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे त्या त्रुटी व वाटपासंदर्भातील अहवाल आम्ही पालकमंत्र्यांना दिला होता. त्यानंतर शासन स्तरावर तीन ते चार वेळा या संदर्भात बैठका घेण्यात आल्या. १६ जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत उपस्थित वन अधिकाऱ्यांनी वनसंज्ञा जमीनीचे वाटप करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याचे स्पष्ट केले. तर महाराष्ट्र शासन उल्लेख असलेल्या जमीनी वाटत करण्याचे अधिकार यापूर्वीच शासनाने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. मात्र, असे असून देखील जिल्हाधिकारी यांच्याकडून याबाबत टाळाटाळ होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचा दबाव आहे की यामागे कोणी पडद्यामागचा सुत्रधार आहे का ? असा संशय उपस्थितांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाचा २६ जुलै रोजी झालेला निर्णय व १३ मार्चला अलिकडेच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेले स्पष्ट निर्देश असताना देखील जिल्हा प्रशासन निष्क्रिय असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे. या उपोषणाच्या माध्यमातून यामागे नेमके कोण आहे ? याचा बुरखा फाडला जाणार असा संदीप गावडे यांनी यावेळी दिला. तर जिल्हाधिकारी यांची बदली करण्यासंदर्भातील मागणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस, तुकाराम बंड,देवसू सरपंच रूपेश सावंत,श्रीकृष्ण गवस आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here