सावंतवाडी,दि.१२: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी नेहमीच सकारात्मक पत्रकारिता जोपासली आहे. पत्रकारितेच्या बाबतीत ते नेहमीच इतरांना न्याय देण्यासाठी झटत असतात. गेले वर्षभर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी धुरा सांभाळताना त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून इतरांना आदर्शवत ठरेल असे कार्य केले आहे, त्यामुळे सावंतवाडी पत्रकार संघाचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार शिक्षणतज्ज्ञ प्रा. राजाराम परब यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अध्यक्षपदास यशस्वी एक वर्ष पूर्ती यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री पवार यांनी या वर्षभरात राबविलेले विविध उपक्रम व त्यांची कारकीर्द याची दखल घेत त्यांचा स्नेह सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. राजाराम परब, सिंधुदुर्ग सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गांवकर, पत्रकार सचिन रेडकर, राजू तावडे, नागेश पाटील, प्रा. रुपेश पाटील,नरेंद्र देशपांडे, प्रसन्ना गोंदावळे, आनंद धोंड, शैलेश मयेकर विनायक गांवस आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले की, हरिश्चंद्र पवार यांचा आदर्श इतर पत्रकारांनी घेणे गरजेचे आहे. अलीकडच्या बदलत्या पत्रकारितेत देखील आपल्या स्वतःच्या पत्रकारितेची तत्वे जोपासणे गरजेचे आहे, तालुका पत्रकार संघाच्या सर्व कार्यकारिणीने आदर्शवत असे काम वर्षभरात केले आहे याचे श्रेय अध्यक्ष पवार यांना जाते.
सत्काराला उत्तर देताना तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार म्हणाले, गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने अनेक सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पत्रकार संघाची उंची वाढवली आहे. हे सर्व कार्य तमाम सदस्य बांधवांमुळे आणि सहकार्यामुळेचं आपण करू शकलो. यापुढेही सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन चांगले कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार आनंद धोंड यांनी मानले.