चिमुकल्यांनी स्नेहसंमेलनात उधळले बालरंग.!
सावंतवाडी,दि.१८: येथील अटल प्रतिष्ठानच्या स्वर्गीय विद्याधर भागवत शिशु वाटिका व वसंत शिशु वाटिका म्हणजे बाल संस्कारांचे उत्तम केंद्र असून येथे शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना भावी आयुष्यात उत्तम नागरिक होण्याचे व खऱ्या अर्थाने माणूस होण्याचे संस्कार दिले जातात. ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले.
येथील अटल प्रतिष्ठान संचलित स्वर्गीय विद्याधर भागवत शिशु वाटिका व वसंत शिशु वाटिका यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील, संस्थेचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर, श्री. प्रभुदेसाई सर, विवेक मुतालिक, प्रधानाचार्या श्रीमती विजया रामाणे, पालक शिक्षक समितीच्या अध्यक्ष मिरा गिरप, उपाध्यक्ष रुचिरा सावंत, तसेच शिशु वाटिका विभागाच्या व्यवस्थापिका डॉ. रश्मी कार्लेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना युवराराज्ञी श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, आज खऱ्या अर्थाने संस्कारांची गरज आहे आणि ते काम अटल प्रतिष्ठानच्या या शिशुविहारामध्ये उत्तम प्रकारे केले जाते. मला एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आले, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते, असेही श्रद्धाराजे म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रा. रुपेश पाटील म्हणाले, आजच्या सोशल मीडियाच्या जगात बालकांवर पाल्यावस्थेत योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. आज प्रत्येक जण धावपळीच्या युगात यंत्रमानव झालेला आहे. अशावेळी बालमनावर योग्य संस्कार करण्याचे काम अटल प्रतिष्ठानच्या शिशुवाटिकेत उत्तम प्रकारे केले जाते. याचे श्रेय येथील सर्व शिक्षिका व संचालकांना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये येथील विद्यार्थी चमकताहेत, ही संस्थेसाठी अत्यंत भूषणावह बाब आहे, असेही प्रा. रूपेश पाटील यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर म्हणाले, आजपर्यंतची वाटचाल यशस्वीरित्या करू शकलो, याचे श्रेय तमाम विश्वास दाखवणाऱ्या पालक व देणगीदारांना जाते. हाच विश्वास भविष्यातही आपण ठेवाल व आपल्या चिमुकल्यांवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवाल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान यावेळी शिशुविहाराच्या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात चिन्मय कोटणीस, सोहम चितारी, भाग्यम धुर, हिमानी धोंड, सर्वेश भराडी, तनिष्का गवस, नीरज केनवडेकर, मनस्वी मांजरेकर, श्रीश सावंत, जान्हवी पित्रे, लोकेंद्र मोदी, श्रावणी मालवणकर, विधी कोटणीस, कार्तिक गावडे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रश्मी कार्लेकर यांनी केले.
यावेळी सत्यभामा परब, रसिका भराडी, धनश्री देऊसकर, सायली सरमळकर, मानसी मोरजकर व समस्त अटल परिवाराच्या टीमने व कर्मचारी वर्गाने कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी पालक समितीतील सदस्य प्रियांका शिरसाट, भारती कालेलकर, रश्मी बांदेकर, सिद्धेश कानसे, डॉ. गोविंद जाधव, प्रा. सागर सावंत, सारिका पाटील, रुपेश सावंत, रवीना राणे, सोनाली चुनेकर, शितल नार्वेकर, मानसी वाटवे, स्वरा लोंढे, जान्हवी सावंत आदि पालकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार आचार्या धनश्री देऊसकर यांनी मानले.