लालबाग भारतमाता येथे ७ फेब्रुवारी रोजी गिरणी कामगार,वारस आणि रहिवाश्यांचे धरणे आंदोलन..

0
111

सिंधुदुर्ग,दि.०५: रखडलेली घरबांधणी आणि गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्बाधणी प्रश्नावर ७ फेब्रुवारी रोजी कामगारांचे भारतमाता सिनेमा मुंबई येथे धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
म्हाडा अंतर्गत पात्रता निश्चिती करण्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. पात्रतेच्या जाचक अटी शिथिल कराव्यात. या प्रश्नांवरील कामगारांची ससेहोलपट थांबवून ताबडतोबीने घरे देण्यात यावीत. तसेच एन टी सी आणि खाजगी गिरण्यांच्या धोकादायक चाळींच्या त्वरीत पुनर्बाधणीचे काम हाती घ्यावे, या मागण्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायं ५ वाजेपर्यंत लालबाग, भारतमाता येथे गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने गिरणी कामगार, वारस आणि रहिवाश्यांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

मुंबईतील जवळपास १ लाख पंच्याहत्तर हजार फॉर्म भरलेल्या कामगारांपैकी गेल्या १५ वर्षात केवळ १५ हजार घरे मिळाली आहेत. उर्वरीत १ लाख पन्नास हजार कामगारांना घरे कधी मिळणार? याचा जाब सरकारला विचारण्यात येणार आहे.

सरकारी तसेच खाजगी गिरण्यांच्या जागेवरील इमारती जीर्ण झाल्या असून त्यावर कधीही अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरण्यांच्या जमिनीवर व्यावसायिक मॉल्स उभे केले जात आहेत. तसेच अन्य व्यावसायिकांना मॉल्स बांधून दिले जात आहेत. पण गिरण्यांच्या पुर्नवसनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कामागारांमध्ये असंतोष पसरला आहे. गिरण्यांच्या चाळींमध्ये राहणारे कामगार किंवा भाडेकरुना कायद्याप्रमाणे त्याच ठिकाणी घरे बांधून मिळालीच पाहिजेत ! वरील दोन्ही मागण्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारीला कामगार आणि भाडेकरूनी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे ! कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविल्याशिवाय झोपेचे सोंग घेतलेले सरकार जागे होणार नाही. तरी कामगार, वारस आणि भाडेकरूंनी आपला न्याय्य लढा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गिरणी कामगार कृती समितीच्या आंदोलन प्रसंगी प्रमुख उपस्थिती आमदार सचिनभाऊ अहिर,जयश्री खाडिलकर – पांडे जयप्रकाश भिलारे , जयवंत गावडे,गोविंदराव मोहिते , निवृत्ती देसाई, नंदू पारकर , जितेंद्र राणे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघटनेचे पदाधिकारी उद्या मंगळवारी सायंकाळी धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती अध्यक्ष शाम कुंभार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here