‘विचार’ एज्युकेशन, पुणे मार्फत सावंतवाडीत ‘प्रशस्त’ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.
सावंतवाडी,दि.२३: कोकणातील विद्यार्थी अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे असून शालांत परीक्षेत त्यांचे यश अत्यंत गौरवास्पद आहे. मात्र असे असतानाही विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळविता आले नाही. मुळातच आपल्या करिअरची निवड करताना त्यांच्या अनेक गोष्टी चुकलेल्या असतात. याचे कारण म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव होय, असे प्रतिपादन प्रा. राजाराम परब यांनी सावंतवाडी येथील आरपीडी विद्यालयात पुणे येथील विचार एज्युकेशन यांच्यावतीने आयोजित प्रशस्त मार्गदर्शन कार्यशाळा दरम्यान केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपप्राचार्य डॉक्टर सुमेधा नाईक धुरी, संस्थेचे संचालक प्रा. सतीश बागवे, विचार एज्युकेशनचे श्री. संदीप दिघे, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा. राजाराम परब यांनी विचार एज्युकेशन, पुणे द्वारा चालविण्यात येत असलेल्या नीट, जेईई, तसेच एमएचटी – सीईटी व अन्य स्पर्धात्मक परीक्षांची सविस्तर माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारा विद्यार्थ्यांना समजवून सांगितली. आपल्या मार्गदर्शनात बोलताना प्रा. राजाराम परब पुढे म्हणाले की, आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच अपेक्षित करिअर घडवतील आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेला न्याय देऊ शकतील. विचार एज्युकेशन मार्फत महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर होतकरू व सामान्य विद्यार्थ्यांना तसेच विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध प्रकारचे मार्गदर्शन केले जात आहे. कोकणातील विद्यार्थ्यांनी याचा सर्वाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
दरम्यान त्यांनी विचार एज्युकेशनल ॲप याबाबत देखील सविस्तर माहिती विशद केली.
प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या वतीने पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संचालक प्राध्यापक सतीश बागवे यांचा सत्कार प्राध्यापक राजाराम परब यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, मुख्याध्यापक जगदीश धोंड, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांचाही सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन शिबिरास प्रा. सतीश बागवे, प्रा. डॉ. सुमेधा नाईक – धुरी, महेंद्र पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. प्रा. संतोष पाथरवट, प्रा. डॉ. अजेय कामत, संदीप दिघे, शीतल कांबळी, आशीष सावंत यांनी संयोजन केले.