भाजप चे माजी नगरसेवक आक्रमक
सावंतवाडी,दि.३०: गेले काही दिवस सावंतवाडीत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन खोदाई मुळे नगरपरिषद कडून करण्यात आलेला रस्ता उखडून गेला असून गॅस पाईपलाईन खोदाई चे वास्तव मांडल्यानंतर आता सावंतवाडी शहरातील भाजपचे माजी नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
गॅस पाईपलाईन खोदाई चे काम नियमबाह्य असल्याचे सांगत या कामाला प्रतिबंध करा अशी मागणी माजी नगरसेवकांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, सुधीर आडिवरेकर, नासिर शेख आदी उपस्थित होते.सावंतवाडीत नगर परिषदेच्या हद्दीत सुरू असलेले गॅस पाईपलाईन खोदाईचे काम नियमबाह्य पद्धतीने सुरू असून नगरपालिका प्रशासनाने परवानगी देताना घातलेल्या नियम व अटी पायदळी तुडविल्या आहेत. त्यामुळे त्याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे.या कामाची जाग्यावर जाऊन पाहणी करून नियमबाह्य कामाला त्वरित प्रतिबंध करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा
तसेच काम सुरू असताना तोडण्यात आलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
सांवतवाडी नगरपरीषद रस्त्यावर गॅस पाईप लाईन घालण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. पुणे या कंपनीला नगरपालिकेकडुन खोदाईची परवानगी दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी देण्यात आलेली होती. परवानगी देताना काही अटी व शर्ती घालण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत कंपनी मार्फत गॅस पाईप खोदाईचे काम चालू असून नगरपरिषद कडून घातलेल्या अटी व शर्ती चे पालन न करता कंपनी मार्फत काम सुरू आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या योग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत या रस्त्याच्या कामकाजाकडे देखरेख होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. या कंपनीचे कामकाज नियमानुसार न चालल्यामुळे मुख्याधिकारी यांनी व्यक्तीशः बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जागेवर भेट देऊन अटी व शर्तीनुसार कामकाज चालते का याचे निरिक्षण करावे तसेच कंपनीचे कामकाज बेकायदेशीर चालु असल्यामुळे त्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.