सावंतवाडी, दि. २० : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अपुऱ्या सुरक्षा रक्षक संख्येमुळे सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमताना अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक संख्येत आणखी दोन पदे मंजूर करावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणीसाठी सुरक्षा रक्षक मंडळ व जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करण्यात आला आहे, असे सुरक्षा रक्षकांच्या सुपरवायझरनी सांगितले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा विस्तार मोठा आहे. एकाच आवारात दोन ठिकाणी रुग्णालयाचे विभाग आहेत. त्यामुळे अपुऱ्या सुरक्षा रक्षक संख्येमुळे महत्वाच्या ठिकाणी ड्युटी लावताना कसरत करण्याची वेळ येत आहे. अपघात विभाग, रक्तपेढी, ओपीडी, एक्सरे विभाग, पार्किंग व्यवस्था व ऑपरेशन विभाग हे एका इमारतीत आहेत. तर दुसऱ्या इमारतीत प्रशासकीय कार्यालय, महिला रुग्ण, प्रसुती विभाग असल्याने रुग्णालयात रुग्णांची कायम गर्दी असते. रुग्णालय मध्यवर्ती असल्याने सावंतवाडीसह अन्य तालुका व जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कायम वाढत आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या सात सुरक्षा रक्षकांवर अतिरिक्त ताण पडत आहे. सकाळच्या सत्रात तीन सुरक्षा रक्षक तैनात ठेवले जातात. दुपारी व रात्री अशी दोनवेळा ड्युटी लावली जाते. किरकोळ कारणावरून रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांचे डॉक्टर व कर्मचाऱ्यांसोबत वादाचे प्रकार वारंवार घडत आहेत. डॉक्टर, रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक संख्येत वाढ होणे गरजेचे आहे. सध्या सात सुरक्षारक्षक सुरक्षा हाताळत आहेत. यापूर्वी सुरक्षा रक्षक मंडळाकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी जादा दोन सुरक्षा रक्षक पदे मंजूर केली. मात्र, मंजूर केलेली दोन पदे अन्य रुग्णालयात वर्ग करण्यात आली. मंजूर केलेली दोन पदे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी त्वरित मिळाल्यास सुरक्षिततेचा प्रश्न सुटणार आहे.