सावंतवाडी,दि.२२: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धडधडीत राहण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणार्या सामाजिक संघटनांनी कायम पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे मत सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी आज येथे मांडले. शहराबरोबर ग्रामीण भागात अशा प्रकारे आरोग्य तपासणी सारखे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमात एखाद्या जरी गरजू रुग्णांना फायदा झाला तर त्या उपक्रमाचे सार्थक झाल्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघ, डिजीटल मीडिया सेल सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबाग परिवाराच्यावतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरात ते बोलत होते.
यावेळी सिंधुदुर्ग डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश्चंद्र पवार, माधवबाग परिवाराचे डॉ. माधवी सांगावकर, डॉ. अमेय पाटकर, शिल्पा गावकर, प्रियांका पाटणकर, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रविण मांजरेकर, विजय देसाई, सचिव मयुर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उमेश सावंत, प्रसाद माधव, अभिमन्यू लोंढे, भुवन नाईक, नितेश देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. ऐवाळे म्हणाले, या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आरोग्य तपासणीचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या जडणघडणीत पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचे आरोग्य सृदृढ रहावे यासाठी माधवबागने घेतलेला पुढाकार फार मोठा आहे. भविष्यात सुध्दा अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असून शहराबरोबर ग्रामीण भागात असलेल्या रुग्णांना त्याचा फायदा मिळवून द्यावा, अशा उपक्रमातून एखाद्या जरी गरजू रुग्णाचा आपण जीव वाचवू शकलो तर त्याचा आनंद हा फार मोठा आहे.
यावेळी श्री. टेंबकर म्हणाले, पत्रकारितेत काम करीत असताना रोजच्या जीवनाकडे दुर्लक्ष होतो. परिणामी आरोग्याचा समतोल बिघडतो. त्यामुळे आरोग्य तपासणी सारखा उपक्रम राबवून थोडासा दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे. हा उपक्रम सावंतवाडीनंतर संपुर्ण जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राबविला जाणार आहे. यावेळी श्री. पवार म्हणाले, पत्रकारांचे आयुष्य हे धावपळीचं असते. त्यामुळे अवेळी जेवण, खाणे अशा गोष्टीमुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते, अशा परिस्थितीत माधवबाग परिवाराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणीचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामचंद्र कुडाळकर तर आभार मयुर चराठकर यांनी मानले.