पारपोली येथील फुलपाखरू महोत्सवाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

0
62

सावंतवाडी,दि.२०: तालुक्यातील पारपोली येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुरत्न योजना राबविल्याने जिल्ह्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहे अशा शब्दात पालकमंत्र्यांनी मंत्री केसरकर यांची स्तुती केली.

फुलपाखरू महोत्सवामुळे पारपोली गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण महोत्सव सातत्याने होणे गरजेचे आहे.

पारपोली गावाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ८० लाखाचा निधी देण्यात आला आहे. जरी मी अपघाताने पालकमंत्री झालो असलो तरी मी इथला भूमिपुत्र आहे त्यामुळे सदैव जिल्ह्याच्या विकासासाठी माझे योग्य योगदान असणार आहे.

यापुढेही जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.

पारपोली येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फुलपाखरु महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली,उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी,आदी उपस्थित होते.

यावेळी महोत्सवाच्या लोगोचे अनावरण आणि माहिती पुस्तिकेचे देखील प्रकाशन यावेळी करण्यात आले तसेच सरपंच कृष्णा नाईक, मानद वन्यजीव संरक्षक काका भिसे यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर श्री केसरकर यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.

श्री केसरकर म्हणाले हा महोत्सव नियमित व्हावा जेणेकरून इथे पर्यटक सातत्याने येतील आणि पर्यटन वाढेल. जिल्ह्यातील उभा दांडा हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. पारपोली गावाने आता जगात फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले निर्माण केली आहे. न्याहरी निवास योजना राबवून सर्वांनी आपल्या गावांचा विकास करावा. गावकऱ्यांनी एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे एकमेकांना जोडून टुरिस्ट सर्किट (tourist circuit) बनवावे असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी किशोर तावडे म्हणाले आपला जिल्हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटक आल्यानंतर गावकऱ्यांनी न्याहरी योजनेच्या माध्यमातून पर्यटकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

श्री रेड्डी म्हणाले पारपोली गावात जैवविविधता असल्याने या गावात १८० पेक्षा जास्त फुलपाखरु प्रजाती आढळतात. २०१५ साली या गावाला ‘फुलपाखरांचे गाव’ म्हणून सन्मान मिळाला आहे. पर्यटन वाढावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी असे महोत्सव सातत्याने होणे आवश्यक आहे. फुलपाखरु महोत्सवामुळे पारपोली गावाला जागतिक ओळख मिळणार आहे. असे महोत्सव जास्तीत जास्त दिवस सुरू ठेवण्याचे आमचे प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर,तहसीलदार श्रीधर पाटील,उप्पर तहसिलदार मोनिका कांबळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, बांधकाचे उपअभियंता वैभव सगरे, आर्किटेक अमित कामत,गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी,सहाय्यक उपवनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडगे, सावंतवाडी वनपरिक्षेत्रपान मदन क्षीरसागर,अशोक दळवी,महेश सारंग, मनोज नाईक,संदीप गावडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here