प्रा.मधू दंडवते स्मारक समितीच्या माध्यमातून मागणी
सावंतवाडी दि.११: कोंकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांची स्मृती जपण्यासाठी कोकण रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रेल्वे स्थानकात माजी खासदार व केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे छायाचित्र ठळक ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी प्रा. मधू दंडवते स्मारक समितीच्या माध्यमातून करण्यात आली.
पालघर ते सावंतवाडी स्थानकावर कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा मधू दंडवते स्मारक समितीच्या वतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला निवेदन देत ही मागणी केली. त्यात प्रामुख्याने सावंतवाडी रेल्वेस्थानकाला टर्मिनस म्हणून जाहीर करुन कार्यान्वित करावे तसेच या टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते’ यांचे नाव देऊन नामकरण करावे अशी मागणी समितीचे निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, भाई देऊलकर, मिहीर मठकर, सागर तळवडेकर यांनी केली आहे.
यावेळी रेल्वे स्थानक रिक्षा युनियन अध्यक्ष संदीप बाईत , उपाध्यक्ष शाम सांगेलकर,
अजित सातार्डेकर,प्रदीप सोनवणे,दिलीप तानावडे,सचिन तळकटकर,सुरेंद्र गावडे,सचिन गावकर,अजित वैज,एकनाथ नाटेकर,अशोक गावडे,महेश खडपकर,भास्कर तांडेल आदी उपस्थित होते.यावर सुमारे ३२० मान्यवर प्रवासी नागरिकांनी सह्या केल्या आहेत.
या निवेदनात म्हटले आहे की, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे. प्राध्यापक दंडवते यांचे कोकण रेल्वे निर्माण कार्यात मोठे ऋण आहेत. दऱ्याखोऱ्यातून कोंकण रेल्वेचे स्वप्न साकारण्याच्या कार्याने ते लोकजिवनात अजरामर आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रेल्वे स्थानकात माजी खासदार व केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे तैलचित्र ठळक ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी स्मारक समितीच्यावतीने करण्यात आली आहे. त्याचबरोबर सावंतवाडी रेल्वेस्थानकाला टर्मिनस म्हणून जाहीर करुन कार्यान्वित करावे तसेच या टर्मिनसचे ‘प्रा. मधू दंडवते’ यांचे नाव देऊन नामकरण करावे अशी प्रमुख मागणी केली आहे. तर कोकण रेल्वेच्या सावंतवाडी, मडुरा, झाराप या स्थानकावर प्रा. दंडवतेंचे तैलचित्र प्रवेशद्वार ठिकाणी भिंतीवर लावण्यात यावे, रत्नागिरी रेल्वे स्थानक ते महामार्ग रस्त्याला ‘प्रा. मधू दंडवते मार्ग’ असे नाव देण्यात यावे, प्रा. मधू दंडवते यांच्या नावे रेल्वे सुरु करावी किंवा विद्यमान रेल्वे गाडीचे नामांतरण करावे, सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस दर्जा देऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आदी मागण्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, २६ जानेवारी २०२४ पर्यंत याची अंमलबजावणी करण्यात यावी. अन्यथा, कोकणचे लोक कोकण रेल्वे कार्यक्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकावर लाक्षणिक धरणे आंदोलन करू असा इशारा देखील को.रे. प्रशासनाला देण्यात आला आहे.