हद्दीचा वाद: विश्वासात न घेतल्याचा आरोप: नंतर मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून रितसर उद्घाटन
सावंतवाडी,दि.१२: आंबोलीत आयोजित करण्यात आलेल्या वर्षा पर्यटन महोत्सव च्या पाश्र्वभूमीवर घाटातील धबधब्यांना अद्यावत करण्याच्या दृष्टीने उपाय योजना करण्यात आल्या त्याचे उद्घाटन शनिवारी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात येण्यापूर्वीच पारपोली येथील ग्रामस्थांनी या धबधब्याचे उद्घाटन करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.पारपोली गावच्या हद्दीत धबधबे असून आम्हाला विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप या ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
आंबोलीतील येथील बहुचर्चित बाहुबली धबधब्यासह अन्य चार ते पाच धबधब्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते उद्घाटन होणार होते. मात्र बाहुबली धबधब्यासह सर्वच धबधबे पारपोली गावाच्या हद्दीत असुनही पारपोली ग्रामपंचायतीला या उद्घाटन सोहळ्या त साधे आमंत्रण ही दिले गेले नाही. या कार्यक्रमाला डावलूनही पारपोली ग्रामस्थांनी या धबधब्याकडे स्वागताचा बॅनर लावला होता.
मात्र तेथील बॅनर अज्ञाताकडून फाडल्याचा आरोप करण्यात आला पारपोली ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेत मंत्र्यांनी या धबधब्याचा शुभारंभ करण्याआधीच आपण शुभारंभ केला.या मध्ये पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, ग्रामपंचायत सदस्य प्रियांका गुरव, माजी उपसरपंच प्रमोद परब, हेमंत गावकर, दत्ताराम गांवकर, दिपक पास्ते, विनायक गांवकर, सोपान परब आदी पारपोली गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरम्यान हा वाद ताजा असतानाच सायंकाळी मंत्री दीपक केसरकर यांनीही वनविभागाच्या अधिकाऱ्यां समवेत अद्यावत करण्यात आलेल्या या सर्वच धबधब्याचे उद्घाटन केले.यावेळी त्यांनी आंबोली चौकुळ व पारपोली ग्रामस्थांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले.यावेळी उपवनसंरक्षक एस.एन रेड्डी तसेच प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसिलदार श्रीधर पाटील यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.