सावंतवाडी,दि.३०: भारतीय जनता पार्टीचे सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगण्यात येत असले तरीही उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
गेल्या तीन वर्षात यशवंत माधव यांनी शक्तीकेंद्र प्रमुख पदाची जबाबदारी घेतल्यानंतर विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली होती. वीज समस्यांबाबत त्यांनी लक्षवेधी उपोषण छेडले होते. कोकण रेल्वेचे प्रश्न, वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसानी, पोटकालव्याची कामे यासाठी निवेदने देऊन संबंधित विभागाचे लक्ष वेधले. पक्षाच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या विकासासाठी प्रभावी कामगिरी केली होती. पक्ष बांधणीसाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी ते कायम पुढे असायचे.
मात्र, ग्रामपंचायत निवडणूकी नंतर ते पक्षाच्या उपक्रमात फारसे सहभागी होत नव्हते. निर्णय प्रक्रियेतही त्यांना डावलण्यात येत होते. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. वैयक्तिक कारणामुळे पक्षासाठी वेळ देणे शक्य नाही. नाराजीचा विषय नाही. यापुढेही भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार, अशी प्रतिक्रिया यशवंत माधव यांनी दिली आहे.