सावंतवाडी : आंबोली घाटात सुमारे ७० फुट खोल दरीत टेम्पो कोसळून चंदगड येथील चालक पुंडलिक सुरेश आसगावकर (29 रा. मांडवळे चंदगड) हा जागीच ठार झाला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली दरम्यान सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलिस व रेस्क्यू टिमला यश आले.
आसगावकर हा गोवा येथे काजू बोंडू देण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला चंदगड येथील आसगावकर हा चालक काजू बोंड घेवून काल सायंकाळी गोवा येथे एकटाच गेला होता. तेथून परतत असताना मोठ्या वळणा वर आंबोलीच्या दिशेने जाणार्या रस्त्याचा त्याला अंदाज आला नाही. आणि त्याचा टेम्पो थेट दरीत कोसळला
याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई, दिपक शिंदे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. मृतदेह खोल दरीत असल्यामुळे
आंबोली रेस्कु टिमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर रेस्कु टिमचे दिपक मेस्त्री, प्रथमेश गावडे, विजय राऊत, वामन पालयेकर, सहदेव सनाम आदींच्या मदतीने आसगावकर याचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.
आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी त्या ठिकाणी धाव घेवून पाहणी केली.