वेंगुर्ले,दि.२७: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आडेली मतदारसंघातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशाचा मान राखत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मनीष दळवी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, भाजपच्या या माघारीनंतर आता आडेली मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना मनीष दळवी म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाच्या हितासाठी आपण खासदार नारायण राणे यांचा आदेश शिरसावंद्य मानला आहे. पक्षाचे काम करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी आपण या निवडणुकीतून माघार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या मतदारसंघातून एकूण १० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मनीष दळवी यांच्यासह आप्पा गावडे, विष्णू खानोलकर, ललित कुमार ठाकूर, जनार्दन कुडाळकर, ओंकार नाईक आणि नित्यानंद शेणई अशा एकूण सात उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
बड्या उमेदवारांच्या या माघारीमुळे आता आडेलीच्या रणांगणात मुख्य लढत समिधा नाईक, शिवसेना (उबाठा) गटाचे विजय नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिग्गज उमेदवारांच्या माघारीनंतर आता या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



