सावंतवाडी,दि.१०: सावंतवाडी आगारातून सोनूर्लीकडे सकाळी सव्वानऊ वाजता सुटणारी बस गेल्या वर्षभरापासून अनियमित असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसच्या वेळेत तात्काळ सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप शिष्टमंडळाने दिला आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांची भेट घेऊन या समस्येवर निवेदन सादर केले.
सोनुर्ली आणि परिसरातील अनेक विद्यार्थी व ग्रामस्थ दररोज सकाळी सव्वानऊच्या बसने सावंतवाडी शहरात शिक्षण आणि विविध कामांसाठी प्रवास करतात. ही बस वेळेवर सुटल्यास साधारणतः दहा वाजता सोनूर्लीत पोहोचते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे शक्य होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून ही बस एकतर उशिराने धावते किंवा अनेकदा रद्द केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांना शाळा-कॉलेजला दांडी मारावी लागत आहे.
त्याचबरोबर, बाजार आणि इतर कामांसाठी सावंतवाडीला येणाऱ्या ग्रामस्थांनाही मोठा फटका बसत आहे. बस वेळेवर नसल्याने त्यांना नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. काही ग्रामस्थांना तर बस पकडण्यासाठी तब्बल पाच किलोमीटर पायपीट करत न्हावेली गावापर्यंत जावे लागत असल्याची गंभीर परिस्थिती आहे.
या गंभीर समस्येबाबत सोनूर्लीचे उपसरपंच भरत गावकर यांनी अनेकदा आगार व्यवस्थापनाकडे तक्रारी केल्या, परंतु आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना झाली नाही. तक्रार केल्यावर एखादा दिवस बस वेळेवर येते आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते, असा संतप्त अनुभव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर, मंगळवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महेश धुरी आणि सचिन बिर्जे यांनी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांची भेट घेऊन विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. बससेवा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
यावेळी, आगार व्यवस्थापक गावित यांनी ही बस वेळेत सोडण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तातडीने केली जाईल, असे आश्वासन महेश सारंग व शिष्टमंडळाला दिले.



