सावंतवाडी,दि.१७ : शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर ४ येथे आज ‘शाळा प्रवेश उत्सव’ मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक भाई केसरकर यांनी या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांची ढोल ताशांचा गजरात जल्लोषात स्वागत करून झाली.
सकाळपासूनच शाळेत विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी दिसू लागली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि शाळेचे प्रवेशद्वार फुग्यांनी सजवण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर यांनी आमदार दीपक भाई व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत केले.
यावेळी अनेक पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित होते. शाळेत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या ‘शाळा प्रवेश उत्सवा’मुळे नवीन विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल आनंदाचे आणि अविस्मरणीय झाले.
यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक भाई केसरकर माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे, डाएट चे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर सुरेश माने, शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापिका लक्ष्मी धारगळकर, प्राध्यापक गिरीधर परांजपे, माजी नगरसेविका स्वप्ना नाटेकर, शर्वरी धारगळकर समृद्धी विरनोडकर दिपाली सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर, किरण नाटेकर नंदू शिरोडकर, महेश पालव आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.